कळंब : तालुक्यातील हावरगाव येथील ग्रामसेवक महेश शिंगाडे हा दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागला आहे. विशेष म्हणजे ही लाच दस्तुरखुद्द गावच्या सरपंचाकडून स्वीकारली असल्याचे समजते. तालुक्यातील हावरगाव येथे ग्रामसेवक म्हणून महेश शिंगाडे हा कार्यरत आहे. या गावाला वित्त आयोगाचा यापूर्वी काही निधी मिळाला होता. याच्या विनियोगासाठी निश्चित करण्यात आलेल्या विकास आराखड्यात काही कामे मंजूर होती. सदर कामे बदलून, त्यास मंजुरी घेण्याची मागणी सरपंच व सदस्यांनी केली होती. यासाठी ग्रामसेवक शिंगाडे याने लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती.
यानुसार कळंब तहसील आवारातील एका हॉटेलात दहा हजारांची लाच घेताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागल्याची घटना घडली आहे. सदर रक्कम ही सरपंच यांच्याकडून घेतली असल्याचे समजते. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.