येडशी - वेळेवर उपचार न मिळाल्याने अपघातग्रस्त तरुणाचा मृत्यू झाल्याचा आराेप करीत नातेवाईकांनी शुक्रवारी मृतदेह दाेन तास आराेग्य केंद्रात ठेवला. संबंधित डाॅक्टरविरुद्ध कारवाईची मागणी केली. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी आराेग्य केंद्रास भेट देऊन दाेषींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले.
येडशी येथील किरण भारत ताकपेरे व किरण धुमाळ हे दाेघे गुरुवारी रामलिंग रस्त्यावर माेटारसायकल अपघातात गंभीर जखमी झाले हाेते. यानंतर त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले, परंतु रुग्णवाहिकेत अन् आराेग्य केंद्रातही डाॅक्टर उपस्थित नव्हते. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी डाॅक्टरांना फाेन लावला, परंतु संपर्क झाला नाही. यात जवळपास तासाभराचा कालावधी गेला. यानंतर संबंधित तरुणास उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले;मात्र जखमीस एक ते दीड तासापूर्वी उपचार मिळाले असते तर कदाचित जीव वाचला असता, असे येथील डाॅक्टरांनी सांगितले, असे नातेवाईक म्हणाले. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी किरण ताकपेरे यांचा मृतदेह प्राथमिक आराेग्य केंद्रात ठेवून डाॅक्टरांविरुद्ध कारवाईची मागणी लावून धरली. ही माहिती मिळताच उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्याचे ८ पाेनि सुरेश साबळे, पाेउपनि हिना शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांसाेबत चर्चा केली. पाेलीस व स्थानिक नेत्यांनी चर्चा करून समजूत काढल्यानंतर किरण ताकपेरे यांचा मृतदेह रुग्णालयातून उचलला. यानंतर साधारणपणे चार वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी आराेग्य केंद्रास भेट दिली. प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच जे काेणी दाेषी असतील, त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले. यावेळी सरपंच गोपाळ नागटिळक, उपसरपंच राहुल पताळे, संजय लोखंडे, गजानन नलावडे, पंकज शिंदे, हैदर पटेल, मदर पटेल, वाघमारे, विशाल शिंदे, गणेश चंदनशिवे, शोहेब पटेल आदी उपस्थित हाेते.