काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गटात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, तीन ग्रामपंचायतींमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून भाजपने मुसंडी मारली आहे.
सलगरा (दि) येथील निवडणुकीत काँग्रेसचे माजी उपसभापती साधू मुळे यांच्या पॅनेलला पराभवाचा सामना करावा लागला. येथे राष्ट्रवादीचे उत्तमराव लोमटे व भाजपचे प्रभाकर मुळे यांनी एकत्र येत ११ पैकी ८ जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले. साधू मुळे यांच्या पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.
किलज ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे लक्ष्मण शिंदे यांनी ३५ वर्षांपासूनची सत्ता कायम राखत सर्वच्या सर्व ११ जागा ताब्यात घेतल्या. जवळगा (मे) येथे भाजपचे जनविस पॅनेल व काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये लढत होऊन भाजप पुरस्कृत बालाजी जगताप, लक्ष्मण इंगळे, सौदागर नरवडे यांच्या पॅनेलला ७ जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला २ जागांवर समाधान मानावे लागले. वानेगाव येथील ग्रामपंचायत बिनविरोध झाली असली, तरी भाजप समर्थक सदस्य जास्त असल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. बारूळ ग्रामपंचायतही बिनविरोध आली असून, येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्रित आले आहेत.