जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा भौतिक अन् गुणात्मकदृष्ट्या कात टाकत आहेत. उपक्रमशील शिक्षक, जागरूक पालक व सजग झालेल्या शालेय व्यवस्थापन समित्या यांच्या संयुक्त प्रयोगातून कष्टकऱ्यांची लेकरे शिक्षणाचे धडे गिरवत असलेल्या या शाळा बदलत आहेत. यापैकीच एक शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी मुख्याध्यापक पदाची सूत्रे घेतल्यानंतर शिक्षक व गावकऱ्यांंच्या सहयाेगातून या शाळेचा कायापालट होत राज्यस्तरावर शाळेचा डंका वाजू लागला. तांबारे यांच्यासोबतच तत्कालीन शिक्षक भास्कर चव्हाण, बोंदरे यांच्यासह प्रदीप रोटे, शहाजी बनसोडे, संजय झिरमिरे, दिलीप पवार, सचिन तामाने, प्रमोदिनी टेळे, रंजना थोरात आदी शिक्षकवृंदांनी शाळेत भौतिक सुधारणा तर घडवून आणल्याच शिवाय नियमित अभ्यासक्रमासह व्यायाम, खेळ, स्पर्धा परीक्षा यावर विशेष भर दिला. यामुळेच विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या सुंदर माझी शाळा, स्वच्छ माझी शाळा उपक्रमात भाटशिरपुरा शाळा अव्वल ठरली आहे. शिक्षक, गावकरी यांनी शाळा विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची ही फलनिष्पत्ती असल्याचे दिसून येत आहे.
चौकट...
मान्यवरांच्या हस्ते गौरव...
शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते भाटशिरपुरा सरपंच सनीता वाघमारे, उपसरपंच मेजर सूर्यकांत खापे, गटशिक्षण अधिकारी मधुकर ताेडकर, माजी सरपंच अच्युत गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ रितपुरे व शिक्षकवृंदांनी सुंदर माझी शाळा अंतर्गत पुरस्कार स्वीकारला.