उस्मानाबाद : जून महिन्यापासून कोरोना बाधितांचा आकडा घटत असतानाच दुसरीकडे डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. पावसाळ्यात जागोजागी साचलेले पाण्यामुळे डासोत्पत्ती वाढली. परिणामी, अनेक भागात डेंग्यूसदृश रुग्ण व डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. काही राज्यात कोरोनाप्रमाणेच डेंग्यूचा व्हायरसही बदलत आहे. मात्र, जिल्ह्यात अशा प्रकारचा बदल झालेला नसता तरी खबरदारी घेण्याचे आवाहन हिवताप विभागाने केले आहे. मागील दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. सातत्याने कोरोनाचा व्हायरस बदलत आहे. त्याचप्रकारे डेंग्यू आजाराचा व्हायरसही बदलत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यात डेंग्यूच्या नव्या व्हायरसचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून डासोत्पत्तीचे स्थाने नष्ट करण्यासाठी रिकाम्या कुंड्या, तुंबलेल्या नाल्याचे पाणी वाहते करणे, तसेच आठवड्यातील एक दिवस कोराडा पाहण्याचे आवाहन हिवताप विभागाने केले आहे.
डेंग्यूचे रुग्ण
जानेवारी ते ऑगस्ट २०२१ - ६५
१ ते २२ सप्टेंबर - २
गुरुवारी तपासणीसाठी पाठविले नमुने - ४
डेंग्यूची अशी आहेत लक्षणे
तीव्र डोकेदुखी, पेशींची संख्या कमी होणे, मळमळ, डोळ्याच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी होणे, अतिथकवा येणे, शारीरिक वेदना होणे, उच्च ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, भूक हरवणे.
डेंग्यू चाचणीची मदार सोलापूर, बीडवर
जिल्ह्यात डेंग्यू आजाराची तपासणी करण्यासाठी लातूर, सोलापूर येथील प्रयोगशाळेकडे रक्तजण नमुने तपासणीस पाठवावे लागतात. जिल्ह्यात अशी प्रयोगशाळा नसल्याने रिपोर्ट येण्यासही विलंब होता.
ॲबेटिंगवर भर
ज्या गावात तापीचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याठिकाणी ॲबेटिंग केली जात आहे. तसेच डेंग्यूचा रुग्ण आढळलेल्या गावात धूर फवारणी करण्यात येत असल्याचे हिवताप विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
कोट...
जिल्ह्यात डेंग्यूच्या नवा व्हायरस आलेला नाही. याबाबत वेगळ्या चाचणीबाबात आरोग्य विभागाकडून सूचना आलेल्या नाहीत. सध्या जिल्ह्यात डेंग्यूसृदश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यांचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेत तपासणीस पाठविले जात आहेत. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे २ रुग्ण आढळून आले.
-डॉ. एम. आर. पांचाळ, जिल्हा हिवताप अधिकारी