उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. मात्र, धोका अद्याप पूर्णत: टळलेला नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयाच फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत असल्याचे चित्र आहे. तसेच अनेक व्यक्ती विनामास्क फिरताना आढळून येत आहेत. ही बाब ‘लोकमत रिॲलिटी चेक’च्या माध्यमातून समोर आली.
जिल्हा रुग्णालयात शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून रुग्ण उपचारासाठी येत असतात. जिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीत कोविड रुग्णालय कार्यान्वित आहे. या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. एप्रिल-मे महिन्यांत रुग्णांचा आकडा वाढल्याने जिल्हा रुग्णालयातील ओपीडी घटली होती. तसेच साधारण आजार असलेले रुग्ण उपचार घेण्यास टाळत होते. एप्रिल, मे महिन्यांत प्रत्येकास मास्क अनिवार्य करण्यात आला होता. शिवाय, फिजिकल डिस्टन्स ठेवण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. सध्या कोविड रुग्णांची संख्या कमी होताच ओपीडी वाढली आहे. त्यासोबतच रुग्ण नातेवाइकांची लगबग वाढली आहे. अनेकजण मास्क वापरत नाहीत. गर्दी करून बसत असल्याचे चित्र आहे.
ओपीडी हाऊसफुल्ल
कोरोनाचे रुग्ण वाढले होते. त्यावेळी दिवसात सरासरी ६०० च्या जवळपास ओपीडी राहत होती. यातही गंभीर आजाराच्या रुग्णांचा समावेश अधिक होता.
सध्या कोविड रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सामान्य आजारांचे रुग्णही उपचारास येत आहेत. शिवाय, बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फिव्हर, फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. सोबतच टाइफाॅईड, अतिसार या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ओपीडी ९०० वर पोहोचली आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
जिल्हा रुग्णालयात केसपेपर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच रुग्णालयाच्या मैदानावर नागरिक गर्दी करून जमत असल्याचे आढळून येत आहे. तसेच तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा पाहावयास मिळत आहेत. या ठिकाणी अंतर ठेवलेले आढळून आले नाही.
मास्क हनुवटीलाच
हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, याकरिता सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही अनेक नागरिक विनामास्क फिरताना आढळून येत आहेत, तर काहीजणांच्या हनुवटीवर मास्क लटकविलेले दिसून येते.
डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढले
पावसाळ्यामुळे नाले, डबक्यांत पाणी साचले आहे. त्यामुळे डासोपत्तीचे प्रमाण वाढले आहे. मागील काही महिन्यांत जिल्ह्याच्या विविध भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. आता डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढले आहेत.
रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नयेत
रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कोरोनासदृश रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रुग्णालयात नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. मात्र, रुग्णालयातच नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णालय सुपर स्प्रेडर ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्हा रुग्णालयात फिजिकल डिस्टन्स, मास्कच्या वापराबद्दल डॉक्टरांकडून वारंवार सूचना केल्या जातात. मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी रुग्ण, नातेवाइकांना मास्क अनिवार्य करण्यात आले. रुग्णालयात रांगेत फिजिकल डिस्टन्स राखण्यासाठी कर्मचारीही सूचना करीत आहेत.
- डॉ. सचिन देशमुख,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक