लोहारा : मे २०२१ मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या लोहारा नगरपंचायतची प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे आता निवडणुकीचे पडघम वाजणार असून, एप्रिल महिन्यात निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. लोहारा नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता, सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिद्ध सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत, प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची अधिसूचना, आदी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यानुसार १ फेब्रुवारी रोजी प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती, तसेच अनुसूचित जमातीची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह मुख्याधिकारी हे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार आहेत. ४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणार असून, ८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी व नगरपंचायतकडून सदस्यपदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
१० फेब्रुवारी रोजी नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून, यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचा समावेश असणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची माहिती नागरिकांच्या माहितीसाठी व हरकती, तसेच सूचना मागविण्याच्या दृष्टीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १५ ते २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार असून, २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी होणार आहे. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन जिल्हाधिकारी १ मार्च रोजी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठविणार आहेत. यानंतर ५ मार्च रोजी विभागीय आयुक्त हे अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणार आहेत. ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतच्या संकेतस्थळावर याची प्रसिद्धी केली जाणार आहे.
चौकट.......
स्थापनेनंतरची दुसरी निवडणूक
लोहारा नगरपंचायत स्थापन झाल्यानंतरची ही दुसरी निवडणूक आहे. यामुळे गावपातळीवरील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता लोहारा नगरपंचायतच्या निवडणुकीचा आखाडा पेटणार असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रभागातील उमेदवारी चाचपणी सुुरू केली आहे. त्यात पक्ष बदलण्याची संख्याही यावेळी मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.