परंडा : तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी कांदा पिकाला नगदी पीक म्हणून प्राधान्य देत आहेत. आजमितीला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाची लागवड होत असून, भविष्यातील कांद्याचे विक्रमी उत्पादन पाहिल्यास कांद्याला चांगला भाव मिळावा, या दृष्टिकोनातून तालुक्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्य प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
सीना-भीमा जोड कालवा, सीना-कोळेगाव धरणासह, अनेक मध्यम प्रकल्प सिंचनाचे स्रोत बनू पाहत आहेत. यासोबतच प्रा.तानाजीराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेले नदी, नाले खोलीकरण व रुंदीकरण व गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये सर्व शासकीय यंत्रणाकडून मृद व जलसंधारणाच्या झालेल्या कामामुळे भूगर्भातील जलस्तर वाढला आहे. त्यामुळे उसाच्या क्षेत्रासह शेतकऱ्यांचा नगदी पिकाकडेही कल वाढला आहे. त्यातच कांदा पिकाला शेतकरी नगदी पीक म्हणून महत्त्व देत आहेत. फक्त पोळ कांद्याचे उत्पादन न होता, लेट खरीप, रब्बी व काही प्रमाणात उन्हाळी हंगामामध्येही कांदा पिकाचे उत्पन्न घेतले जात आहे. कांदा पिकाला हमीभाव नसल्याने बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना तोट्याची शेती करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी कांदा पिकाला साधारणपणे १८ हजारांपर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर मात्र, कांद्याचे दर कोसळतच आहेत. अशा काळात तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत व स्वखर्चाने कांदा चाळीही उभारल्या आहेत. कांदा पिकाचे दर कोसळल्यास उन्हाळी हंगामातील कांदा पीक चाळीमध्ये साठविला जातो. मात्र, या सुविधा सगळ्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाहीत. अशा वेळी त्यांना उतरत्या दराचा सर्वाधिक फटका बसतो. मात्र, अशा काळात कांद्यावरील प्रक्रिया उद्योग केंद्र मदतीला धावून येऊ शकते. मात्र, तालुक्यात कांद्यावरील प्रक्रिया उद्योग केंद्र अस्तित्वात नाही. तालुक्यातील सिंचनाचे वाढते क्षेत्र पाहता, कृषी विभागाकडून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्य प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. परिणामी, भविष्यात कांदा पिकावरील प्रक्रिया उद्योग स्थापन होऊन, शेतकरी बांधवांना उत्पादित कांदा पिकाला हमीभाव मिळेल व आर्थिक जीवनमान उंचावेले, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
चौकट....
प्रक्रिया उद्योग केंद्र नाही.....
सध्या स्थिती मध्ये उन्हाळी कांदा पिकाला १,३०० ते १,४०० सरासरी भाव आहे, तसेच सोयाबीन, उडीद या पिकाचे हेक्टर क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. कृषी विभागामार्फत उडीद, कपाशी, कांदा व सोयाबीन या पिकाचे कीड-रोग व सल्ला प्रकल्पांतर्गत निरीक्षणे नोंदवून आर्थिक नुकसान पातळीबाबत सल्ला दिला जात आहे. तालुक्यात शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा उतरविला असून, त्यात प्रामुख्याने उडीद, सोयाबीन कांदा पिकांचा शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. तालुक्यात कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन होऊनही कांद्यावरील प्रक्रिया उद्योग केंद्र अस्तित्वात नाही. कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
170921\psx_20210917_143451.jpg
नगदी पीक म्हणून परंडा तालुक्यातील अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे लागवड करण्यात येत आहे.