उस्मानाबाद : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी तर आतापर्यंतचे सर्वाधिक ४० अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी मुख्य रस्ते, बाजारपेठेत अंशत: लॉकडाऊनप्रमाणे चित्र दिसून येत आहे.
मागील चार दिवसांत तापमानाने चांगलीच उसळी घेतली आहे. एकाच आठवड्यात ३५ वरुन पारा चाळिशीपार पोहोचला आहे. २३ व २४ मार्च रोजी जिल्ह्यातील तापमान हे ३५ अंशावर होते. २५ रोजी पारा एक अंशाने पुढे सरकन तो ३६.६ वर गेला. यानंतर २६ मार्च रोजी दीड अंशाने तापमानात वाढ होऊन ३८.१ अंशावर गेला. २८ मार्चपासून तापमानात नियमित वाढ होत असल्याचे दिसून आहे. या तीन दिवसांतच तापमानाची वाटचाल चाळिशीकडे सुरु झाली. अखेर बुधवारी पारा ४० अंशावर पोहोचलाही. मार्चमध्येच इतकी उष्णता लक्षात घेता आगामी उन्हाळ्यातील चटक्याचे संकेत मिळू लागले आहेत.
सोमवारचे रेकॉर्ड...
मागील आठवड्याची तापमानाची सुरुवात ही ३५ अंश सेल्शिअसने झाली होती. यात नियमित वाढ होत जाऊन या आठवड्यात २९ मार्च रोजी सर्वाधिक तापमानाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. या दिवशी कमाल तापमान ३९.८ अंश तर किमान २२.९ अंश सेल्शिअस इतके राहिले.
असा राहिल आठवडा...
एप्रिल महिन्याची सुरुवातही उन्हाच्या चटक्यानेच होणार आहे. स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभरात सरासरी तापमान हे ३९ अंशाच्या घरात राहील. यात सर्वाधिक ४१ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद ही ३ एप्रिल रोजी होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.