पाथरूड : परिवर्तन मंचच्या पुढाकाराने भूम तालुक्यातील पाथरूड येथील ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा ठराव गावचे ग्रामदैवत वैजनाथ मंदिर येथे झाला होता. हा ठराव प्रत्यक्षात उतरविण्यासाठी परिवर्तन मंचच्या सर्व सदस्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, सर्वच पक्षांकडून अर्ज भरण्यात आले व ते कायमही ठेवण्यात आल्याने परिवर्तन मंचच्या सर्व ११ सदस्यांनी सोमवारी माघार घेतली. यामुळे पुन्हा एकदा पाथरूड ग्रामपंचायत निवडणुकीचे जोरदार घमासान पेटले आहे.
पाथरूड ही ११ सदस्यसंख्या व ४ प्रभाग असलेल्या विस्तारलेल्या तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. येथे सर्वच प्रमुख पक्षांचे मोठे वर्चस्व आहे. गत निवडणुकीत येथे राष्ट्रवादी सत्तेवर होती. मात्र, नंतर सत्तेतील राष्ट्रवादीचा गट भाजपत गेल्याने प्रथमच येथील ग्रामपंचायत भाजपकडे आली. सध्या याच सत्ताधारी भाजपच्या विरोधात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी करून सत्ताधारी भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.