कळंब : तालुक्यातील शिराढोण येथे शनिवारी चार कावळे अज्ञात कारणांमुळे मृत झाल्याचे समोर आल्यानंतर एका कावळ्याचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामुळे बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शिराढोणला ‘अलर्ट झोन’ म्हणून जाहीर केले आहे.
राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लूच्या पॉझिटिव्ह केसेस समोर आल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले आहे. या अनुषंगाने कोंबड्या, कावळे, पारवे आदी पक्षीवर्गीयांचा अज्ञात कारणांमुळे मृत्यू होत असेल तर विशेष काळजी घेतली जात आहे. कळंब तालुक्यातही सर्वरोग लघू पशुचिकित्सालय व ग्रामीण भागातील ११ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या यंत्रणेमार्फत विशेष असे निरीक्षण करून खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, शिराढोण येथे चार कावळे अज्ञात आजाराने किंवा कारणांमुळे मृत्यू पावल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी यासंबधी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यास अवगत केले. यानंतर कळंब येथून विशेष तपासणी पथक शिराढोण येथे दाखल झाले. त्यांनी या मृत कावळ्यांची तपासणी व पाहणी करून एका कावळ्याचा नमुना घेतला. सदर नमुना तातडीने पुण्याच्या औंध येथील राज्य रोग अन्वेषण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, कावळे अज्ञात आजाराने दगावल्याने व मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने या पक्ष्यांना कोणता आजार झाला हे अनिष्कर्शित आहे. यामुळे प्राण्यामधील संक्रमक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रक अधिनियमान्वये सर्वेक्षणाचे काम पूर्णत्वास येईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शिराढोण येथील दहा किलोमीटर त्रिज्येचा भाग ‘अलर्ट झोन’ (सतर्क भाग) म्हणून घोषित केला आहे. यानुसार जिवंत व मृत कुक्कुटपक्षी व यासंबंधीची वाहतूक यासह विविध निर्बंध घालण्यात आले आहेत.
निदान अहवालाकडे लक्ष
मृत पक्ष्यांचा निदान अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले. यामुळे या भागातील नागरिकांचे पुणे येथील प्रयोगशाळेतून येणाऱ्या निदान अहवालाकडे लक्ष लागले आहे. हा अहवाल येईपर्यंत प्रशासनाने ‘अलर्ट झोन’ घोषित करताना घातलेले निर्बंध राहणार आहेत.