(फोटो : गोविंद खुरूद २०)
तुळजापूर : येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात लहुजी शक्ती सेनेने सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. नगर परिषदेतील जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाची दिशाभूल केली, अनुकंपाधारकांच्या कायम नियुक्त्या थांबवल्या तसेच लहुजी बाबा, संघटना व सोमनाथ कांबळे यांना अवमानकारक अपशब्द वापरून समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आंदोलकांचा आहे. तसेच या प्रकरणी संबंधितांवर ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, चार दिवसांत प्रशासनाने दखल न घेतल्याने पुढील काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. चौथ्या दिवशी जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, सूरज सगट, संतोष गायकवाड, संतोष मोरे, डॉ. मारुती क्षीरसागर, सुदेश शिंदे, सुभाष गव्हाळे, कुंडलीक भोवाळ, विशाल सगट, दीपक रोडगे, लक्ष्मी गायकवाड, विमल शिंदे, रेखा सरवदे, कोंडाबाई गायकवाड, गयाबाई देडे, अनुजा गायकवाड आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला.