कळंब (जि. उस्मानाबाद) : गत महिन्यातच कळंब शहरात दरोड्याच्या उद्देशाने शिरलेल्या एका टोळक्याने वॉचमनशी झटापट झाल्यानंतर त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीने पळ काढून नाशिक गाठत गजरे विकणे सुरू केले होते. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मंगळवारी न्यायालयाने २३ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.
कळंब शहरातील मार्केट यार्ड परिसरातील अजय जाधव यांच्या आडत दुकानात दरोड्याच्या उद्देशाने एक टोळी ५ जूनच्या मध्यरात्री शिरली होती. मात्र, यातील म्होरक्याला तेथे रखवालीसाठी असलेल्या मच्छिंद्र छगन माने यांचा सामना करावा लागला. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. तेव्हा आरोपीने स्वत:कडील बंदूक काढून माने यांच्या छातीवर गोळी झाडत खून केला. या घटनेनंतर कळंब व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ आरोपींना २४ तासांत अटक केली. मात्र, उर्वरित जवळपास ६ आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, या घटनेतील सूत्रधार आरोपी आबड्या ऊर्फ सुनील नाना काळे (वय २१, रा. कल्पनानगर, कळंब) हा असल्याचे समोर आल्यानंतर कळंब पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. चौकशीत तो नाशिकला वास्तव्याला गेला असून, गजरे विकत असल्याची माहिती मिळाली होती. याआधारे पोलिसांच्या एका पथकाने नाशिक पोलिसांच्या मदतीने या आरोपीस नाशिक येथून ताब्यात घेतले. त्यास कळंबला आणण्यात आले असून, मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, २३ जुलैपर्यंत पोलीस काेठडी सुनावण्यात आली आहे.