भूम : २७ जानेवारी पासून ५ ते ८ चे वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या अनुषंगाने शिक्षण विभागाने देखील तयारी सुरू केली असून, यासाठी शुक्रवारपासून येथील ग्रामीण रुग्णालयात शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी परीक्षा रद्द करण्यात आल्या. शिवाय, चालू शैक्षणिक वर्षात केवळ नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सध्या सुरू असून, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे दिले जात आहेत. दरम्यान, आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार येथील गटशिक्षण कार्यालयाने तयारी सुरू केली आहे.
तालुक्यात ५ ते ८ वी च्या खाजगीसह एकूण ८४ शाळा असून, यात ८ हजार ६५७ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. सध्या प्रशासनाने शाळा सुरु करण्यासाठी वर्गखोल्यांची सफाई, शौचालय सफाई, शाळा सॅनिटाईझ करणे आदी कामे पूर्ण करण्याच्या सूचना गटशिक्षण कार्यालयाने संबंधित मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. शिवाय, शाळा निर्जंतूक करण्यासाठी येणारा खर्च १४ व्या वित्त आयोगातून करण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आल्याचे गटशिक्षण कार्यालयातून सांगण्यात आले.
दरम्यान, कोविडच्या धर्तीवर शाळा सुरु होण्यासाठी शिक्षकांची कोरोना चाचणी आवश्यक आहे. या अनुषंगाने २२ ते २६ जानेवारी या काळात येथील ग्रामीण रुग्णालयात चाचणी करून घेण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या असून, या अनुषंगाने तालुक्यातील ८४ शाळांच्या मुख्यध्यापकांना लेखी पत्र काढण्यात आले आहे. या माध्यमातून जवळपास ३५० शिक्षकांची कोविड चाचणी होणार आहे. कोरोनामुळे गेल्या ११ महिन्यापासून बंद असणाऱ्या शाळा २७ जानेवारी पासून सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असली तरी किती पालक पाल्यांना शाळेत पाठवतील, अभ्यासक्रम पूर्ण होईल का, परीक्षा कधी आणि कशा होतील, हे आता शाळा सुरु झाल्यानंतरच समजणार आहे.
कोट........
शासनाच्या आदेशानुसार २७ जानेवारी पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत. या अनुषंगाने संबंधित शिक्षकांना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ही सोय येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे. शिवाय, शाळा सुरु झाल्यानंतर फिजिकल डिस्टन्ससह कोरोनाबाबत इतर नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
- सुनील गायकवाड, गटशिक्षणाधिकारी, भूम