उस्मानाबाद : मागील काही दिवसात जिल्ह्यातील बहुतांश भागात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील मध्यम ७ व ६८ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात मोठा १, मध्यम १७, लघु २०८ असे एकूण २२६ प्रकल्प आहेत. प्रकल्पाची साठवण क्षमता ७२६. ८३१ आहे. या प्रकल्पातून अनेक शहरे व गावांना पाणीपुरवठा होतो. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले तर वर्षभर पाणीपुरवठा होत असतो. गतवर्षी मान्सूनमध्ये दमदार पाऊस झाला होता. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यापर्यंत निम्म्याच्यावर प्रकल्पामध्ये मुबलक पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली नाही. जून महिन्यात मान्सूनने हजेरी लावली. त्यानंतर जुलै महिन्यातही पाऊस पडत राहिला. ऑगस्ट महिन्यात तीन आठवडे पावसाने उघडीप दिली होती. सप्टेंबर महिन्यात पावसाची जोरदार एन्ट्री झाली. त्यामुळे प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत राहिल्याने ७५ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. १७ प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. २७ प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के, २८ प्रकल्पात २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. ४४ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. तर ६ प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत.
५६.२९ उपयुक्त पाणीसाठा
जिल्ह्यातील प्रकल्पाची साठवण क्षमता ७२६. ८३१ आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १५७.५११३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी २१.६७ इतकी होती. तर यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ४०९.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी ५६.२९ टक्के आहे.
ऑगस्ट महिन्यात तीन आठवडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. मागील चार दिवसात झालेल्या पावसामुळे काहीअंशी दिलासा मिळाला. काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे काढणीला आलेला उडीद, मूग ही पिके पाण्याखाली गेली होती. या पिकांचे नुकसान झाले; मात्र चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.