विजय माने
परंडा : मागील दीड वर्षापासून अंगणवाड्या बंद असून, कोरोना व सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने राज्यभर नंदुरबार पॅटर्न राबवण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत परंडा तालुक्यात राबविलेल्या विशेष मोहीमेत १११ तीव्र कुपोषित बालके आढळली असून, या बालकांना शासन निर्देशानुसार उपचार व पोषण सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मार्च २०२० पासून अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे बालकांची आरोग्य तपासणी झाली नव्हती. त्यामुळे दुसरी लाट ओसरल्यानंतर बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून सर्वेक्षण झाले आहे. याअंतर्गत गेल्या तीन आठवड्यापूर्वी बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून कुपोषित बालकांची शोध मोहीम शहर व तालुकाभर राबविण्यात आली. या शोध मोहिमेत बालकांचे वजन, उचीचे मोजमाप करण्यात आले. याचा अहवाल नुकताच कार्यालयाला प्राप्त झाला आहे. या शोध मोहीमेमध्ये प्रकल्प अधिकारी, ३ परिवेक्षका, १८७ सेविका, १४९ मदतनीस यांनी यात सहभाग नोंदविला.
दरम्यान, आगामी काळात गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली तसेच सॅम-मॅम श्रेणीतील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी देखील विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष पथकाची नियुक्ती होणार असल्याचे बालविकास प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आले.
चौकट....
कशामुळे कुपोषण...
शून्य ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना कोरोना काळामध्ये लॉकडाऊन तसेच पोषक आहार मिळण्यात आलेल्या अडचणी, विविध कारणांमुळे पालकांचेही दुर्लक्ष झाले. अंगणवाड्या बंद असल्याने घरपोच आहार मिळाला; परंतु आरोग्य तपासण्या झाल्या नाहीत. त्यामुळे तीव्र कुपोषण असलेली बालके आढळली.
कोट....
मागील महिन्यात पंधरा दिवस राबविलेल्या मोहिमेत आढळलेल्या तीव्र कुपोषित बालकांना मध्यम कुपोषित गटात आणण्यासाठी शासन निर्देशानुसार ग्राम बाल विकास केंद्र सुरू केले जाणार आहेत. तेथे पूरक पोषण आणि आरोग्य सेवेचा लाभ त्यांना देण्यात येणार आहे.
- अमोल चव्हाण, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी, परंडा
चौकट.....
७३२ बालके मध्यम कुपोषित
या मोहिमेत शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे वजन आणि उंची मोजण्यात आली. यात ८ हजार ६३१ बालके सर्वसाधारण स्थितीत आढळून आले. ७३२ बालके मध्यम कुपोषित असल्याचे तपासणीत निदर्शनास आले, तर या मोहिमेत १११ तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत.
चौकट....
९४९३
सर्वेक्षणानुसार बालके
९४७४
वजन-उंची मापन केलेली बालके
८६३१
साधारण पोषण स्थिती असलेली बालके
७३२
मध्यम कुपोषित बालके
१११
तीव्र कुपोषित बालके