अणदूर येथील चन्नबसव बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था मागील काही वर्षांपासून पर्यावरण संवर्धनावर काम करीत आहे. शासनाचा फंड अथवा निधी न घेता किंवा कुठला प्रकल्प न राबवता ही संस्था स्वखर्चातून पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अणदूर येथे ट्री बँकेची स्थापना करून गावातील बँकेत हजारो वृक्ष जमा केले. जे मागतील त्यांना या बँकेतून वृक्ष राेपे दिली जातात. या अनाेख्या बँकेला काहींनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून तर काहींनी अन्य आनंदाेत्सवाचे निमित्त साधून वृक्ष राेपे भेट दिली. त्यामुळे वृक्षलागवडीची एक चळवळ निर्माण झाली आहे. संस्थेचे संस्थापक शिवशंकर तिरगुळे हे केवळ वृक्षलागवडीच्या अनुषंगाने आवाहन करून थांबले नाहीत. तर त्यांनी स्वतः हातात कुदळ, फावडे, घमेले घेऊन वृक्षलागवड केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर, झाडांच्या संगाेपनाकडेही ते दुर्लक्ष हाेऊ देत नाहीत. प्रत्येक वर्षी ते झाडांचा वाढदिवस साजरा करतात. या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केला आहे. संस्थेने गणेशोत्सव सोहळ्यामध्ये नवरात्र महोत्सवांमध्ये, थोरामोठ्यांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्ताने पर्यावरणाच्या युवक, विद्यार्थी यांच्यात विविध स्पर्धा घेऊन वृक्षांचे पारितोषक वितरण केले आहे. मकरसंक्रांत सणांमध्ये वाण म्हणून वृक्ष लुटण्याची प्रेरणा महिलांना दिली. अणदूर येथे एक व्यापारी एक रोप ही संकल्पना राबवून शंभर व्यापाऱ्यांना त्यांनी वृक्ष राेपे भेट दिली. शिक्षक दिन, परिचारिका दिन, डॉक्टर दिन, जागतिक महिला दिन ,मैत्री दिन ,छायाचित्रकार दिन याचे औचित्य साधून संस्थेने हार-तुरे, फेटा याला फाटा देऊन वृक्ष राेपांची भेट देण्याचा पायंडा निर्माण केला.
काेट...
पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबविण्यासाठी मी उचललेलं एक पाऊल आहे. ही सृष्टी नटावी, अणदूरचे नंदनवन व्हावे, स्वच्छ व आनंदी जीवन इथला नागरिक जगावा. अणदूरच्या कोणत्याच नागरिकांना ऑक्सिजन लावण्याची गरज भासणार नाही यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची गरज आहे. भविष्यात ५ हजार झाडे अणदूर परिसरात लावण्याचा संकल्प आहे.
-शिवशंकर तिरगुळे, संस्थापक, चन्नबसव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अणदूर
-----------------------------------------------------
फोटो--वृक्ष लागवड करताना संस्थेचे पदाधिकारी, झाडांचा वाढदिवस साजरा करताना, शाळा- शाळांमधून वृक्षारोपण, माळरानावर झाडाचे करीत असलेले संगोपन, ट्री बँकेची स्थापना करताना पदाधिकारी.