Kalyan Marathi Girl Assault: कल्याण शहरातील नांदिवली भागात एका खाजगी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली. एका रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतील पुरूषाने बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना रुग्णालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आरोपी गोकुळ झा (Gokul Jha) हा मुलीचे केस पकडून तिला जमिनीवर आपटताना आणि तिला फरफटत नेताना दिसला. या प्रकरणातील पीडिता असलेली मराठी रिसेप्शनिस्ट तरुणी सोनाली (Sonali) हिने सगळा प्रकार आणि घटनाक्रम सांगितला.
तरूणीने सांगितला घटनाक्रम
"मी बाल चिकित्सालय क्लिनिक मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब करते. अनन्या झा नावाच्या रुग्णाबरोबर तो व्यक्ती आला होता. मी पहिल्यांदाच त्याला इथे पाहिले. तो व्यक्ती आतमध्ये जाण्यासाठी खूप घाई करत होता. मी त्याला एवढंच बोलले की, तुमचा सध्या नंबर नाहीये, तुम्ही १० मिनिटे वाट बघा. तर त्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी शिवीगाळ केल्यानंतर मी आमच्या सरांना सांगितले की हा व्यक्ती माझ्याशी योग्य पद्धतीने बोलत नाहीये. मी त्याला असेही सांगितले की तू माझ्याशी नीट बोल. तर तो माणूस माझ्या अंगावर मारण्यासाठी धावला आणि त्यानंतर माझे केस पकडून दरवाजापर्यंत मला खेचत खेचत नेले. मला त्यांनी एवढे मारलं की माझा श्वासही थोड्या क्षणांसाठी थांबला होता," अशी सोनालीने माहिती दिली.
मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचारी आणि व्यवस्थापनात घबराट पसरली. पीडितेच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गोपाळ झा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे आणि आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.