लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात दुचाकी आणि रिक्षाचोरीचे सत्र सुरू असताना येथील मानपाडा पोलिसांनी एका सराईत चोरट्याला गुरुवारी पहाटे पाच वाजता एमआयडीसी परिसरातून अटक केली. महेश ऊर्फ बाबू ऊर्फ पद्या मनोज साळुंखे (वय २१, रा. खडवली, सोरगाव) असे त्यांचे नाव आहे. त्याच्याकडून नऊ दुचाकी आणि एक रिक्षा असा एकूण पाच लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दुचाकी आणि रिक्षा चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. सहायक पोलीस निरीक्षक अनिल भिसे, पोलीस हवालदार सोमनाथ टिकेकर, भानुदास काटकर, सुधीर कदम, पोलीस नाईक संजू मासाळ, सुधाकर भोसले, पोलीस शिपाई अशोक आहेर आणि सोपान काकाड यांचे पथक गुरुवारी पहाटे एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना युनिक चौकात एक जण दुचाकी संशयास्पद घेऊन जाताना आढळला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली. त्याने विसंगत माहिती दिली. त्याला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता त्याने ती दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
घराच्या मागे लपवून ठेवायचा गाड्या साळुंखे हा काहीच कामधंदा करीत नसून चोरीच्या दुचाकी आणि रिक्षा तो त्याच्या गावच्या घराच्या मागे लपवून ठेवत असे. जसे गिऱ्हाईक येईल त्याप्रमाणे तो दुचाकी व रिक्षाची विक्री करणार होता, अशी माहिती तपासात निष्पन्न झाल्याचे बागडे यांनी सांगितले.
नऊ दुचाकी,एक रिक्षा जप्त साळुंखेने मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नारपोली, मुंब्रा आणि विलेपार्ले येथे प्रत्येकी एक असे एकूण १० गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यांमधील नऊ दुचाकी आणि एक रिक्षा जप्त केली आहे.