जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या अक्षय म्हेत्रे (२५) आणि शुभम नगरकर (२१) या दोघांना अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी बुधवारी दिली. या दोघांनाही २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कासारवडवली परिसरातील या तरुणीला अक्षय याने सुरुवातीला तुझ्यावर प्रेम करत असल्याचे सांगितले. तिने त्याचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर तिला आणि तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर २२ ऑगस्टला बलात्कार केला. त्यानंतरही या प्रकाराची वाच्यता इतरत्र करण्याची धमकी देत त्याने पुन्हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तिच्यावर अत्याचार केले. तिने आपल्यावरील आपबिती तिच्याच एका ओळखीतील शुभम नगरकर याला सांगितली तेव्हा त्याने तिला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या भाईंदर येथील घरी बोलावून घेतले. त्यानेही तिला हा प्रकार नातेवाईकांना तसेच इतरत्र सांगण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले.
वारंवार होणारे हे प्रकार सहन न झाल्याने अखेर तिने याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात १९ डिसेंबरला तक्रार दाखल केली. या प्रकाराची गांभीर्यांने दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुलील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश मसुरकर यांच्या पथकाने यातील अक्षय आणि शुभम या दोघांचीही मंगळवारी पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली. या चौकशी दरम्यान त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.