लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वृद्धांना आमिष दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हातोहात लांबविणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले. त्यांच्याकडून तब्बल २१ तोळ्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल असा सुमारे १२ लाख ४४ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
विकी राम साळुंखे (वय २२, रा. समतानगर, साक्री रोड धुळे, जि. धुळे), विजय सुभाष नवले (३९, रा. वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, सातारा शहरातील जुना मोटार स्टँड परिसरात १२ फेब्रुवारी एका वृद्ध महिलेस अनोळखी व्यक्तींनी अडवले. शेठला खूप वर्षांनी मुलगा झाला असून तो साडी वाटप करीत आहे. धान्यवाटप करीत आहे. असे आमिष दाखवून त्यांच्या गळ्यातील दागिने काढण्यास सांगितले. ते दागिने पिशवीत ठेवण्याचे नाटक करून दागिने हातोहात लांबविले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. जिथं ही घटना घडली होती. तेथील आणि सातारा शहर, सातारा तालुका आणि टोलनाका परिसरातील तब्बल ५४ सीसीटीव्ही तपासले. या सीसीटीव्हीमध्ये वरील संशयित दुचाकीवरून जात असल्याचे समोर आले.
या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिस संशयितापर्यंत पोहोचले. पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी एक पथक तयार करून धुळे येथे पाठवले. एवढेच नव्हे तर पोलिसांनी आरोपींच्या घराजवळ साध्या वेशात सापळा लावून चार दिवस त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले. त्यांच्याकडे कसून चाैकशी केल्यानंतर त्यांनी सातारा, कोरेगावसह, सांगली, कोल्हापूर, मुंबई, फलटण, नंदुरबार, नगर शहरामध्ये अशाच प्रकारे वृद्धांना लुबाडल्याचे समोर आले. या दोघांची टोळी असून, त्यांच्या टोळीमध्ये आणखी तिघांचा समावेश आहे. संबंधित तिघेही फरार आहेत. चोरी केलेले सोने या चोरट्यांनी नीरा येथील ज्वेलर्सच्या दुकानात विकले होते. पोलिसांनी त्या सराफाकडून चोरीचे ११ लाखांचे २१ तोळे सोने, दोन दुचाकी, मोबाइल जप्त केले.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, काॅन्स्टेबल लैलेश फडतरे, हसन तडवी, पोलिस नाईक अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, सचिन पवार, स्वप्नील पवार, स्वप्नील सावंत यांनी केली.
दहा गुन्हे उघडकीस..
या टोळीकडून आमिष दाखविण्याची एकच पद्धत होती, ती म्हणजे शेठला खूप वर्षांनी मुलगा झालाय. तो साडी वाटप करतोय, असं सांगितले जात हाेते. तुमच्या गळ्यातील दागिने पाहिले तर तो तुम्हाला साडी देणार नाही. त्यामुळे दागिने काढून द्या, असं सांगून दागिने हातोहात लांबवायचे, अशा प्रकारे या टोळक्याने अनेक जिल्ह्यांत धुमाकूळ घातला होता. त्यांच्याकडून तब्बल दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.