गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विज बिल न भरल्याचा मेसेज टाकत एका विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याला गंडा घालत त्याच्या खात्यातून हजारो रुपये उडवण्याचा प्रकार सहार पोलिसांच्या हद्दीत घडला. या विरोधात कर्मचाऱ्याने तक्रार दिल्यावर पोलिसांनी अनोळखी भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार सुनील कांबळे (५४) हे एअर इंडिया एअरलाइन्समध्ये नोकरी करतात. ते कामाच्या ठिकाणी असताना ६ मे रोजी त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून एक मेसेज आला. जो मेसेज विद्युत मंत्रालयकडून आलेल्या नोटीशी प्रमाणे भासत होता. तसेच त्यात राहत्या घराचे विज बिल तुम्ही भरले नसल्याने आज रात्री ९ वाजता तुमचा वीज पुरवठा खंडित होईल. तसेच वीज बिल तुम्ही भरले असल्यास ते अपडेट करण्यासाठी व्हाट्सअपवर प्राप्त झालेल्या देवेश जोशी यांच्या मोबाईलवर संपर्क करा असे नमूद करण्यात आले होते.
कांबळे यांनी सदर क्रमांकावर फोन केल्यावर फोन उचलणाऱ्या व्यक्तीने तो इलेक्ट्रिसिटी विभागा मधून बोलत असल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा माझे लाईट बिल अपडेट करायचे आहे अशी विनंती कांबळे यांनी त्याला केली. त्या व्यक्तीने त्यांना व्हाट्सअपवर एक एप्लीकेशन पाठवत ते डाऊनलोड करा आणि त्यासाठी तीन रुपये चार्ज आकारला जात बिल अपडेट होईल असे सांगितले. कांबळे यांनी ती फाईल डाऊनलोड केली आणि त्यांना एक ओटीपी प्राप्त झाला जो त्यांनी कोणालाही शेअर केला नाही. मात्र तरी देखील मोबाईलला संलग्न असलेल्या त्यांच्या मुलाच्या खात्यातून ३ रुपये काढण्यात आले. याबाबत त्यांनी देवेशला फोन करत विचारणा केल्यावर तो उडवाउडवीची उत्तर देऊ लागला.
तसेच त्यांचे संभाषण सुरू असतानाच कांबळे यांच्या खात्यातून पुन्हा तीन व्यवहारांमध्ये एकूण ४७ हजार ४९० रुपये काढून घेण्यात आले. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर कांबळे यांनी लगेचच फोन बंद करून सदर ॲप डिलीट करून टाकली. तसेच या विरोधात सहार पोलिसांकडे धाव घेतली.