लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने मंगळवारी दुहेरी खून प्रकरणातील आरोपी बापलेकासह चौघांना आजन्म कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. एस. ए. एस. एम. अली यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील आहे.प्रशांत अर्जुन चमके (३८), अंकुश झनक तोमसकर (१९), झनक मुन्नालाल तोमसकर (४१) व शिवमोहन रामकृपाल मलिक (२३), अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना खुनाच्या गुन्ह्यासाठी प्रत्येकी आजन्म कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी पाच वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, यासह अन्य शिक्षा सुनावण्यात आली. मीना झनक तोमसकर (३७) व वंदना हरवीर जैस (३०) या दोन महिला आरोपींना दुखापत करण्याच्या गुन्ह्यासाठी एक वर्ष कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली गेली. न्यायालयात सरकारने आरोपींविरुद्ध १८ साक्षीदार तपासले.इमरत राणा व पुरणलाल राणा अशी मयतांची नावे असून, ते सख्खे भाऊ होते. ते अंबाटोली येथे राहात होते. इमरत बांधकाम मिस्त्री होता. त्याला मुलगी व मुलगा असून घटनेच्या वेळी मुलगी सात तर, मुलगा पाच वर्षे वयाचा होता. ही घटना १२ जून २०१६ रोजी घडली. त्या दिवशी आरोपी प्रशांतच्या घरी कार्यक्रम होता. त्यामुळे त्याने इमरतला त्याच्या घरातील नालीची सफाई करण्यास सांगितले. त्यावरून वाद वाढत गेला. दरम्यान, आरोपींनी इमरत व त्याची पत्नी सुनीता यांना सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर इमरतला चाकूने वार करून ठार मारले. पुरणलाल इमरतला वाचविण्यासाठी गेला होता. आरोपींनी त्याचाही चाकूने भोसकून खून केला. न्यायालयात सरकारच्या वतीने मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.
नागपुरातील राणा बंधू हत्याकांड : बापलेकासह चौघांना आजन्म कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 21:25 IST
सत्र न्यायालयाने मंगळवारी दुहेरी खून प्रकरणातील आरोपी बापलेकासह चौघांना आजन्म कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. एस. ए. एस. एम. अली यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील आहे.
नागपुरातील राणा बंधू हत्याकांड : बापलेकासह चौघांना आजन्म कारावास
ठळक मुद्देसत्र न्यायालय : जरीपटक्यात घडला होता थरार