गोंदिया : गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जुनेवानी जंगल परिसरात जमिनीत खड्डा खोदून मोहफुलाची हातभट्टी दारू काढणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली. येथून एक टिनाचा ड्रम, एक लोखंडी टवरा, एक प्लास्टिक पाईप, सडवा मोहफूल, प्लास्टिक पोतडीतील मोहफुल २१० किलो, टिनाचे पिपे, मोहफुलाची हातभट्टी दारू असा एकूण ४५ हजाराचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, गंगाझरीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक महेश बन्सोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाझरी येथील पोलिसांनी २१ डिसेंबर रोजी ही कारवाई केली. जुनेवानी जंगल परिसरात जमिनीत खड्डा खोदून त्याची चूल तयार करण्यात आली होती. त्या चुलीवर मोठा लोखंडी ड्रम व त्यावर जर्मनचे भांडे ठेवून मोहफुलाची हातभट्टी दारू काढत असल्याचे पोलिसांना आढळले.
या प्रकरणात आरोपी संजय धर्मराज चौधरी (४२), रामा गौतु तुमसरे (६०), शशीकुमार गणपत मेश्राम (४५) तिन्ही रा.रा. एकोडी, ता.जि. गोंदिया यांच्यावर गंगाझरी पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ब) (क)(ड)(ई )(फ), ८३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पराग उल्लेवार, पोलीस हवालदार सुभाष हिवरे, पोलीस शिपाई राजेश राऊत, अशोक मौजे, प्रशांत गौतम यांनी केली आहे.