नवी दिल्ली - तेच सोनं, तीच तस्करी आणि दुबई कनेक्शन...५ वर्षापूर्वी केरळमध्ये सोने तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. तेच आता कर्नाटकात होताना दिसत आहे. केरळमध्येही तत्कालीन नेत्यांभोवती संशयाचं वादळ होते, आज पुन्हा नेत्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे. कर्नाटकातील कन्नड अभिनेत्री रान्या राव तस्करी प्रकरणी चर्चेत आली आहे. रान्या रावला ३ मार्च रोजी दुबईच्या सोने तस्करी आरोपात बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून तब्बल १५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे ज्याची किंमत १२.५६ कोटी इतकी आहे.
तपासात रान्याचे राजकीय कनेक्शन समोर आले आहे. रान्याच्या फोनमध्ये अनेक नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सापडले. त्यात सध्याचे आणि माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. या प्रकरणाचा डीआरआय तपास करत असून इतक्या प्रभावशाली लोकांसोबत रान्याचा संपर्क कसा, या संपूर्ण संघटित नेटवर्कचं संभाव्य कनेक्शन तपासलं जात आहे.
भाजपाचा दावा काय?
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने तस्करीशी जोडल्या गेलेल्या मंत्र्याचे नाव उघड करावे अशी मागणी भाजपाने केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणात समोर आलेल्या मंत्र्यांच्या नावाचा खुलासा करावा. रान्याने ३० हून अधिक वेळा परदेश दौरा केला, इथं परतल्यावर तिला प्रोटोकॉल दिला होता. एक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी म्हणून रान्याला विमानतळावर पोलीस एस्कॉर्टसह स्पेशल ट्रिटमेंट मिळाली आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष बीवाय विजेयद्र यांनी सांगितले. रान्या राव आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची मुलगी आहे. रान्या रावला तपासातून सूट दिले होती म्हणजे ती मंत्र्यासह अनेक दिग्गजांच्या संपर्कात होती हे दिसून येते. हवाला ऑपरेटर, सोने तस्करी करणारे माफिया, आमदार आणि माजी मंत्री हे सर्व यात सहभागी आहेत. या सर्वांची नावे जाहीर केली पाहिजेत अशी मागणी भाजपाने केली.
दरम्यान, या प्रकरणाशी निगडीत राजकीय कनेक्शनची चौकशी करायला हवी. या घोटाळ्याची तुलना भाजपाने केरळातील अशाच प्रकरणाशी केली. ५ जुलै २०२० रोजी केरळच्या तिरूवनंतपुरम विमानतळावर अधिकाऱ्यांनी ३० किलोहून अधिक सोने असलेली बॅग पकडली होती. यात १५ कोटीहून अधिक सोने होते. याचा तपास केला असता स्वप्ना सुरेश, संदीप नायर यांना बंगळुरूत अटक करण्यात आली. तपासात या सोने तस्करांच्या टोळीला राजकीय वरदहस्त असल्याचं समोर आले. या प्रकाराने केरळमधील सत्ताधारी वामपंथी सरकार वादात सापडलं होते.