बिहारमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. मुलांनी त्यांच्या आई-वडिलांचा इतका छळ केला की ते कंटाळले आणि त्यांनी गंगेत उडी मारली. स्थानिक लोकांनी वृद्धाला वाचवलं, परंतु या घटनेत महिला बेपत्ता झाली. अलखनाथ घाटावर ही घटना घडली. धीरज चौधरी यांनी त्यांची पत्नी मानती देवींसह गंगा नदीत उडी मारली.
नदीत आंघोळ करणाऱ्या लोकांनी दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी धीरज चौधरी यांना वाचवलं. परंतु ते मानती देवींना वाचवू शकले नाहीत आणि त्या गंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या. मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध जोडप्याने त्यांच्या मुलांमुळे हे आत्महत्येचं पाऊल उचललं. धीरज चौधरींना दोन मुलं आहेत. परंतु एकही त्यांच्या वृद्धापकाळाचा आधार बनत नाही.
धीरज यांनी सांगितलं की, मुलांनी त्यांची वडिलोपार्जित जमीन विकली आहे आणि ते पालकांना म्हणजेच धीरज आणि त्यांच्या पत्नीला खायला काहीही देत नाहीत. उपाशी राहण्यापेक्षा मरण चांगलं. त्यानंतर निराश होऊन दाम्पत्याने पाऊल उचललं आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. ते त्याच्या पत्नीसह अलखनाथ घाटावर गेले आणि रविवारी सकाळी त्यांनी गंगा नदीत उडी मारली.
गेल्या चार दिवसांपासून या वृद्ध जोडप्याला अन्नाचा एक कणही मिळाला नव्हता. अशा परिस्थितीत दोघेही भुकेने व्याकूळ झाले होते. वृद्ध दाम्पत्याने गंगा नदीत उडी मारताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. गंगा नदीत आंघोळ करणारे लोक दोघांनाही वाचवण्यासाठी धावले. मात्र त्यांना महिलेला वाचवता आले नाही. गंगा नदीच्या जोरदार प्रवाहात मानती देवी वाहून गेल्या. आता पोलिसांनी धीरज चौधरी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.