नालासोपारा : अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियनला तुळिंजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून दोन कोटी आठ लाख रुपयांचे एक किलो ४० ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आहे.
प्रगतीनगरच्या जगन्नाथ अपार्टमेंटच्या रूम नंबर २०६ मध्ये नायजेरियनकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती तुळिंजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी संशयित ठिकाणी रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास छापा टाकला.
रोख रक्कम, इलेक्ट्रिक वजन काटाही जप्तत्यावेळी नायजेरियन आरोपी चीमा मॉसेस गॉडसन चीमा (वय ४०) याला ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतल्यावर वेगवेगळ्या प्लास्टिक थैलीमध्ये दोन कोटी आठ लाख रुपये किमतीचे एक किलो ४० ग्रॅम वजनाचे पांढऱ्या रंगाचे बारीक खडे असलेले मेफेड्रोन मिळून आले आहे. रोख रक्कम, पिशव्या, इलेक्ट्रिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त केला आहे. तुळिंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहायक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील, तुळिंजचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांनी केली.