लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): वसईतील मुळगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या रिक्षा चालकासह तीन नकली तृतीय पंथीयांना स्थानिकांनी चोप दिला. स्थानिकांचा रोष इतका अनावर झाला होता पोलीस आल्या नंतरही जमाव शांत होण्यास तयार नव्हता.
अधिक माहितीनुसार, वसईतील खोचिवडे गावातील दोन शाळकरी मुली नेहमीप्रमाणे मुळगाव खारेकुरण येथून चालत येत होत्या. यावेळी रिक्षा क्रमांक एम एच ०४ एफ सी ९७३४ मधून जाणारे आरोपी शरद शिंदे, संजय गोलनकर, निलेश मांडवकर, रिक्षा चालक सुरज मातोल (सर्व राहणार कळवा) यांनी सदर अल्पवयीन मुलींना पकडून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले.
दोन्ही अल्पवयीन मुलींनी बचावासाठी मोठ्याने आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करत सदर नकली तृतीय पंथियांसह रिक्षा चालकाला जबर मारहाण केली. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचले.
यानंतर आरोपींना सर डी.एम. पेटिट रुग्णालयात वैद्यकीय चिकित्सासाठी दाखल करून प्रथमोपचारा नंतर वसई पोलीस ठाण्यात आणण्यात आले. प्राथमिक चौकशी केली असता सदरचे इसम तृतीय पंथीय असल्याचा बनाव करून लोकांकडून पैसे मागत होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून सदरची रिक्षा व इसम या परिसरात टेहळणी करत असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत सीसीटीव्ही फुटेज व अन्य माहिती संकलित करून त्याद्वारे आरोपीं विरोधात पुरावे जमा केले जात आहेत. पीडित मुलींचे जाबजबाब नोंद केले जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली.