बाभूळगाव (यवतमाळ) : शेळ्या चारुन एक मुलगा व मुलीच्या भविष्य सुखकर करणाऱ्या मात्या-पित्याला मोठी किंमत चुकवावी लागली. मुलाला व मुलीला आई-वडिलाने स्वतंत्र घर दिले. बहिणीला घर का दिले यावरून वाद घालत दारूड्या मुलाने बुधवारी रात्री स्वत:च्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. यात आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहे. ही घटना तालुक्यातील यावली येथे घडली.
पार्वतीबाई महादेव डेबूर (६२) असे मृत आईचे नाव आहे. तर महादेव डेबूर (६५) हे गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर जितेंद्र महादेव डेबूर (३५) याने पावड्याने हल्ला करून दोघांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपीची बहीण सुनंदा भारत मेटकर यांच्या तक्रारीवरून बाभूळगाव पोलिसांनी जितेंद्र डेबूर व त्याची पत्नी सुशीला डेबूर या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
महादेव व पार्वताबाई हे दोघे शेळ्या चारुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मुलगा जितेंद्र, सुनंदा या दोघांना स्वतंत्र घर दिले. इतकेच नव्हे तर मुलगा जितेंद्र व त्याची पत्नी यांच्या सोईसाठी दुचाकी घेवून दिली. या दुचाकीच्या कर्जाचे हप्ते महादेव डेबूर हे भरत होते. मात्र जितेंद्र व त्याची पत्नी सुशीला हे दोघेही समाधानी नव्हते. व्यसनाधीन जितेंद्र नेहमीच कर्ज घेवून मौजमजा करीत होता. वृद्ध आई-वडील एकटा मुलगा आहे म्हणून त्याला शक्य ती आर्थिक मदत करीत होते. हाच लोभ आई-वडिलांच्या अंगलट आला. दारूच्या नशेत सैतान बनलेल्या जितेंद्रने बुधवारी रात्री आई-वडिलांसोबत वाद घालून त्यांच्यावर लोखंडी फावड्याने हल्ला केला. यात पार्वताबाई जागीच ठार झाली तर महादेव डेबूर हे गंभीर जखमी झाले. घटना माहीत होताच मुलगी सुनंदा हिने आई-वडिलांना तातडीने गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात हलविले. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक चौधरी, जमादार दीपक आसकर हे अधिक तपास करीत आहे. दोन्ही आरोपींना त्यांनी घटनेनंतर काही तासातच अटक केली.