नाशिक : अवघ्या १४ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून लावत तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार करणाऱ्या नराधमास तब्बल वीस वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंड, अशी कठोर शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायमूर्ती पी.व्ही. घुले यांनी सुनावली. शुक्रवारी (दि.२४) निकाल लागला. कोटमगाव (ता. नाशिक) येथे १५ मार्च २०२३ रोजी संतोष वाघ यांच्या घरासमोर घटना घडली होती.
पीडित बालिकेच्या वडिलांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात सागर संतोष वाघ (२७) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. सागर याने पीडित बालिकेस फूस लाऊन गुजरात येथे पळवून नेले. हॉटेलमध्ये नेत तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केला. नराधम सागर याच्याविरोधात भादंवि कलम ३६३, ३७६, ५०६ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम चारनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिकरोडच्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सुवर्णा हांडोरे यांनी घटनेचा सखोल तपास करून पुरावे गोळा केले. जिल्हा सत्र न्यायालयात खटला चालला. सरकारी अभियोक्ता म्हणून लीना चव्हाण यांनी प्रभावीपणे काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून धनश्री हासे, एस.आर.शिंदे, मोनिका तेजाळे यांनी शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला.