मुंबई : पवईत राहत्या घरातच ६५ वर्षांच्या वृद्धेची हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे. आजारपण आणि व्यवसायात आलेल्या मंदीला कंटाळून पतीनेच तिची हत्या केल्याचा संशय आहे. त्यानुसार, पवई पोलीस त्याचा शोध घेत आहेत.शीला लाड (६५) असे वृद्धेचे नाव होते. त्या पवईच्या तुंगा परिसरातील साकीविहार रोडवरील शिवशक्ती सोसायटीत पती अजित (७०) यांच्यासोबत राहत होत्या. पवई परिसरातील एका घरात महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा कॉल रविवारी पोलीस नियंत्रण कक्षाला आला. त्यानुसार, पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, लाड यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनीकेले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. गळा दाबून नंतर डोक्यात अवजड वस्तूने हल्ला करत, शीला यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक अहवालात उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला.शीला लाड यांच्या घरात त्यांचे पती अजित यांनी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्या चिठ्ठीत मी स्वत:चेदेखील बरेवाईट करून घेईन, असा उल्लेख असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यानुसार, शीला यांच्या हत्येमागे त्यांचे पती अजित यांचाच हात असल्याचा प्राथमिक संशय असून, पती पसार आहे. पोलीस त्यांचा शोध घेतआहेत.कामगारांचेही थकविले होते पगारअजित यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून तो नीट चालत नव्हता. मागील दोन महिने त्यांच्याकडील कामगारांचे पगारही त्यांनी दिले नव्हते. यातच पत्नी शीला सतत आजारी असायच्या, त्यामुळे त्यांच्या औषधपाण्यासाठी बराच पैसा खर्च होत असे. याच सगळ्याला कंटाळून अजित यांनी पत्नीची हत्या करून, त्यानंतर स्वत:लाही संपविण्याचा निर्णय घेतला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
पवईत राहत्या घरातच वृद्धेची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 05:52 IST