जमीर काझीमुंबई - प्रजासत्ताक व महाराष्ट्र दिनी दादरमधील शिवाजी पार्कच्या मैदानावर सकाळपासून रखरखत्या उन्हामध्ये संचलन आणि कवायती करत उपस्थितांची मने जिंकणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पथकाला आता या वर्षापासून पुरेसा अल्पोहार मिळणार आहे. त्यांना या दिवशी पौष्टिक पायनेपल शिरा व केळी दिली जाणार आहेत.अर्धपोटी असूनही कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी कडक गणवेषात आकर्षक कवायती करणाऱ्या जवानांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत त्याची त्याबदल्यात केवळ दुध किंवा लस्सीवर बोळवण केली जात होती. मुंबईचे पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अल्पोहार बदलाबाबत पाठविलेल्या प्रस्तावाला आता राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून पोलिसांना हा अल्पोहार दिला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला व महाराष्ट्र दिन म्हणजे १ मे दिवशी दरवर्षी शिवाजी पार्कवर होणाऱ्या शासकीय समारंभात मुंबई पोलिसांकडून चित्तथरारक संचलन केले जाते. त्यावेळी विविध विभागाचे चित्ररथ देखील साजरा केला जातो. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या सोहळ्यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी सशस्त्र दलातील जवानांकडून कित्येक दिवस आधीपासून तयारी केली जाता असते. कार्यक्रमाच्या चार दिवसांपूर्वी प्रत्यक्ष मैदानावर तीनवेळा तालीम तर पूर्वदिनी एकदा रंगीत तालीम घेतली जाते. त्यासाठी सकाळी साडेसहा वाजल्यापासून दुपारपर्यंत जवानांना हजेरी लावावी लागते. मैदानावर घाम घाळल्यानंतर जवानांना भूक लागली असताना त्यांना सरकारी खर्चात केवळ लस्सी किंवा दुध, बिस्कीट आणि दोन केळी दिली जात असत. त्यामुळे भूक भागत नसल्याने जवानांना स्वत:च्या खर्चाने बाहेर जाऊन खावे लागत असते. अल्पोहारावर केल्या जाणाऱ्या या अत्यल्प खर्चाबद्दल जवानांकडून ओरड होत होती. त्यामुळे सशस्त्र दलाच्या विभाग प्रमुखांनी लस्सी किंवा दुधाऐवजी त्यांना घनरुपात आहार म्हणून पायनेपल शिरा द्यावा, असा प्रस्ताव बनविला होता. पोलीस आयुक्त सुबोध जायसवाल यांनी तो मंजुरीकरीता महासंचालक कार्यालयाकरवी राज्य सरकारकडे पाठविला. गेल्यावर्षी २१ डिसेंबरला पाठविलेल्या प्रस्तावाला सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे.नव्या निर्णयानुसार संचलन पथकातील प्रत्येक जवानाला यावर्षीच्या २६ जानेवारीला पायनापल शिरा आणि दोन केळी दिले जाणार आहे. मात्र, तयारी आणि रंगीत तालमीच्या चार दिवसासाठी पूर्वीप्रमाणेच लस्सी किंवा दुध, बिस्किट्स आणि दोन केळी दिली जाणार आहे. प्रजासत्ताक व महाराष्ट्र दिनानिमित्याने संचलन पथकाला द्यावयाच्या मोफत अल्पोहाराची सुविधा देण्याची जबाबदारी सशस्त्र विभागातील अप्पर आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी शासकीय पुरवठादारांशी संपर्क करुन लस्सी व दुध आणि दर्जेदार शिरा उपलब्ध करण्याची व्यवस्था करावयाची आहे.
खुशखबर! पोलिसांना मिळणार लस्सीऐवजी पौष्टिक शिरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 20:10 IST
अल्पोहार बदलाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील
खुशखबर! पोलिसांना मिळणार लस्सीऐवजी पौष्टिक शिरा
ठळक मुद्दे मुंबई पोलिसांच्या पथकाला आता या वर्षापासून पुरेसा अल्पोहार मिळणार आहे.गेल्यावर्षी २१ डिसेंबरला पाठविलेल्या प्रस्तावाला सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे.लस्सी किंवा दुधाऐवजी त्यांना घनरुपात आहार म्हणून पायनेपल शिरा द्यावा, असा प्रस्ताव बनविला होता