नवी दिल्ली - सध्या इंटरनेटच्या जगतात डिजिटल फसवणुकीचे प्रमाण वाढलं आहे. दिवसेंदिवस सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. त्यातच आता नवा ट्रेंड सुरू झाला आहे. ज्यातून युवकांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे लाटले जात आहेत. सायबर गुन्हेगारांनी आणलेला हा ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे. ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब नावाने सायबर गुन्हेगार युवकांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे हडप करत आहेत.
युवक बऱ्याचदा सोशल मीडियावर स्क्रॉल करत असतात. त्यात त्यांची नजर ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब सर्व्हिस या पेजवर पडते. नेमकी ही सेवा काय आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना असते. महिलांना प्रेग्नेंट करून लाखो रुपये कमवण्याची ही ऑफर असते. त्यात श्रीमंत घरातील महिलांना मुल होत नसल्याने एक रात्र त्या महिलेसोबत घालवून त्यांना गर्भवती करण्याचं आमिष दाखवले जाते. काही युवक त्या नंबरवर फोन करून संपर्क साधतात.
जर जॉबसाठी ऑनलाईन अर्ज भरून दिला तर त्यासाठी १२०० रुपये शुल्क भरून रजिस्टर करावे लागते. यानंतर संबंधित युवकाला ग्राहकाला भेटण्यासाठी बंगळुरू किंवा अन्य ठिकाणी जावे लागते. एकदा रजिस्टर केले तर त्या महिलेची माहिती दिली जाते जिला प्रेग्नेंट करायचे आहे. युवकांना पहिल्या महिन्यापासून ३ ते ८ लाख कमाईची ऑफर दिली जाते. युवक या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. नाव गोपनीय ठेवण्यावरून करार होतो, त्यानंतर सीमेन तपासणी आणि नियम अटी सांगितल्या जातात. प्रोसेसची सुरुवात झाल्यानंतर युवकांकडून २० हजार घेतले जातात. कोर्टाची कागदपत्रे २८५० आणि १५५०० डिपॉझिट मनीसह जीएसटीच्या नावावर वसूल केले जातात.
दरम्यान, सर्व कागदपत्रे, पावती आणि कोर्टात जमा करण्यासाठी केलेले एग्रीमेंट दाखवले जाते. ज्यावर युवकाचं नाव, पत्ता, साक्षीदारांची नावे आणि वकिलांची सही असते. त्याशिवाय बेबी बर्थ एग्रीमेंट, NOC आणि प्रेग्नेंसी व्हेरिफिकेशन फॉर्म भरून घेतला जातो. युवकाला विश्वास व्हावा यासाठी १२ हून अधिक महिलांचे फोटो पाठवले जातात. काही दिवसांनी युवकाच्या मोबाईलवर मेसेज येतो, तुमच्या बँक खात्यात २,१५,५०० रुपये जमा होणार आहेत परंतु ते तोपर्यंत होल्डवर ठेवले, जोवर इन्कम टॅक्सचे १०५०० रुपये जमा होणार नाहीत असं सांगितले जाते. युवकाकडून पैसे पाठवल्यानंतर समोरून रिस्पॉन्स बंद होतो, पैसे येत नाहीत अशाप्रकारे युवकांची फसवणूक केली जाते.
या फसवणुकीपासून कसं वाचायचं?
- अशा संशयित जॉब वेबसाईट आणि लिंकपासून सावध राहा
- काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवू नका, पैसे पाठवू नका
- अज्ञातांसोबत खासगी माहिती शेअर करू नका
- बँक डिटेल्स, आधार, पॅनकार्ड नंबर देऊ नका
- अशा ऑफर देणाऱ्या कॉलपासून दूर राहा
- तुमची फसवणूक होतेय हे लक्षात येताच पोलिसांशी संपर्क साधा