मुंबई : मुंबईत हायअलर्ट असताना, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली येथील मुख्यालयाच्या दूरध्वनीवर ‘दहशतवादी हल्ला होणार, रोखता आला तर रोखून दाखवा’ अशा धमकीच्या कॉलने खळबळ उडाली. मुंबईतही बंदोबस्त वाढला. मात्र, तपासात कॉल करणारा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे समजताच मुंबई गुन्हे शाखेने त्याला अटक केली.
धक्कादायक म्हणजे, पाकिस्तानात फोन करण्यासोबत हा तरुण सोशल मीडियावर आयएसआय (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना), आयसीस, सीरिया आणि अन्य यंत्रणांबाबत माहिती मिळवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. त्यानुसार, राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने तरुणाची चौकशी सुरू आहे.शुभमकुमार पाल (२२) असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या हेतूबाबत तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याने, एनआयएच्या मुख्यालयात कॉल करून ‘बॉम्बे में कुछ बडा होनेवाला है, रोक सको तो रोक लो’ असे बोलून फोन कट केला. त्याच्या या कॉलमुळे मुंबईत बंदोबस्त वाढविण्यात आला. दहशतवाद विरोधी पथकासह गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केला. तपासाअंती हे पथक शुभमपर्यंत पोहोचले. त्याला तांत्रिक तपासातून गोरेगावच्या नेस्को, आयटी पार्क येथून अटक केली. त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाइलद्वारे त्याने एनआयए कार्यालयात कॉल केल्याचे स्पष्ट झाले.