प्रेमप्रकरणात झालेल्या वादातून एका तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना इंदूरमध्ये घडली आहे. सुदैवाने, खाली असलेल्या तारांमध्ये अडकल्याने तिचा जीव वाचला, मात्र या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. खरगोन येथील रहिवासी असलेल्या या तरुणीला तिच्या प्रियकराने फसवलं होतं, असं तिने पोलिसांना सांगितलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा ही तरुणी तिचा प्रियकर आवेशच्या घरी गेली होती. तिथे त्यांच्यात जोरदार वाद झाला. आवेशने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यामुळे तो तिला धोका देत असल्याचा आरोप तिने केला. त्यांच्यातील वाद इतका वाढला की, त्यांच्यात हाणामारी देखील झाली. पीडितेने आरोप केला की, जेव्हा तिने विरोध केला तेव्हा आवेशने तिचं तोंड दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तिसऱ्या मजल्यावरून घेतली उडीया घटनेनंतर, रागाच्या भरात तरुणी तिसऱ्या मजल्यावर गेली आणि तिने तिथून खाली उडी मारली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आवेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी ही घटना मोबाईलवर रेकॉर्ड केल्याचं दिसतं. व्हिडीओमध्ये ते तरुणीला शिवीगाळ करतानाही ऐकू येत आहेत. तरुणी खाली पडल्यानंतर घाबरलेल्या आवेशने आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेले. तिथे त्यांनी ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला. आवेशने तरुणीच्या मोबाईलमधील चॅटिंग आणि इतर पुरावे डिलीट केल्याचाही आरोप आहे. थोड्या वेळाने आरोपी आणि त्याचे कुटुंब रुग्णालयातून पळून गेले.
पीडितेचा गंभीर आरोपजखमी तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, तिची आणि आवेशची ओळख इंस्टाग्रामवर झाली होती. गेल्या चार वर्षांपासून ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. यादरम्यान, लग्नाचं वचन देऊन त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, पण त्याने दिलेल्या वचनानुसार लग्न केलं नाही. यापूर्वी देखील तिने या प्रकरणी एफआयआर दाखल केली होती, ज्यामुळे आवेशला तुरुंगात जावं लागलं होतं. पीडितेने आरोप केला आहे की, नंतर आवेशने तिच्यासोबत तडजोड केली आणि तुरुंगातून बाहेर आल्यावर लग्न करण्याचं आश्वासन दिलं. मात्र, त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. इतकंच नव्हे तर, १५ ऑगस्टला आरोपीने तिला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचंही तिने पोलिसांना सांगितलं.
पोलीस तपास सुरूसेंट्रल कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, तरुणीचा जबाब नोंदवला जात आहे. पुरावे आणि व्हिडिओची तपासणी केल्यानंतर आरोपींवर एफआयआर दाखल केली जाईल. सध्या तरुणीची प्रकृती स्थिर आहे.