नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात धर्म परिवर्तन रॅकेट चालवणाऱ्या छांगूर बाबाला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. त्यानंतर या छांगूर बाबाचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. अनेक गरीब कुटुंबाला पैशाचे आमिष दाखवून, धमकावून धर्म परिवर्तन करायला भाग पाडणाऱ्या छांगूर बाबाचे खरे टार्गेट होते तरुण मुली. एक संपूर्ण टोळी या मुलींना फसवून त्यांना धर्मांतर करण्यास दबाव टाकायची. अशीच एक महिला समोर आली आहे जी छांगूर बाबाच्या या खेळात बळी पडली होती. कर्नाटकात राहणाऱ्या या मुलीसोबत प्रेमाच्या नावाखाली फसवणूक, कैद, सामुहिक बलात्कार आणि बेदम मारहाण अशा भयानक घटना घडल्या आहेत.
या मुलीने तिच्यासोबत घडलेले थरारक प्रसंग सांगितले आहेत. २०१९ मध्ये जेव्हा तिच्या मोठ्या भावाचे निधन झाले तेव्हापासून ती एकटी पडली. कुटुंबातही इतर कुणी नव्हते. त्याचवेळी राजू राठोड नावाच्या युवकासोबत इन्स्टाग्रामवर तिची ओळख झाली. राजू तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा परंतु सुरुवातीला तिने राजूला दुर्लक्षित केले. त्यानंतर एक महिला राजूची वहिनी असल्याचे सांगत बोलायला लागली. तिच्या सांगण्यावरून राजूसोबत ओळख वाढवली. फोन नंबर दिले, तो स्वत:ला राजपूत असल्याचे सांगत होता. संशय नको म्हणून तो त्याच्या डीपीला रोज कुठल्या ना कुठल्या देवाचा फोटो लावायचा.
रोजच्या बोलण्यातून एकेदिवशी त्याने मला लग्नासाठी मागणी घातली. त्याच्या वहिनीने तुझ्या घरी कुणी नाही, एकटीच असते लग्न केले तर कुटुंब मिळेल असं समजावले. त्यांनी बोलण्यातून मला लग्न करण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. राजू सौदी अरबला राहायचा, त्याला यायला वेळ आहे तोपर्यंत तू दुसरा देश पाहून ये. तिथे नोकरीही मिळेल, कुटुंबही सोबत असेल असं सांगितले तेव्हा मी लग्नाला तयार झाले. प्रोफेशनल ब्यूटीशियन होते, हे विकून मी लग्न केले. राजू जेव्हा कॉल करायचा तेव्हा सौदी अरबच्या उंच इमारती, स्वच्छ रस्ते दिसायचे. मी दिल्लीला गेले तेव्हा राजूचे वडील आणि वहिनी भेटले. ते मला एअरपोर्टवर सोडायला आले होते. माझ्यासोबत आणखी एक व्यक्ती होता जो मला प्रवासात मदत करत होता. तो राजूला ओळखत होता. राजूला पहिल्यांदा भेटणार होते. तो हिंदू असल्याचे भासवत होता असं तिने सांगितले.
दरम्यान, मी तिथे पोहचले तेव्हा राजूने घरी आणखी २-४ जणांना बोलावले होते. सर्वांसमोर मला मंगळसूत्र घातले आणि कुंकू लावले. मला काही कळाले नाही इतके सगळे वेगाने घडले. काही तासांनी त्याने मला कॉल केला आणि धर्म बदलण्यासाठी सांगितले. मी घाबरले. फोन ठेवला, हा कुठल्या धर्माचे बोलत आहे मला काही कळत नव्हते. आम्ही दोघेही हिंदू आहोत मग कुणाला धर्म बदलायचा आहे, तेव्हा खरे कारण समोर आले, तो राजू राठोड नव्हता तर वसीम होता आणि मला आयशा बनायला सांगत होता. सौदीत पोहचल्यानंतर काही तासांतच माझे आयुष्य बदलले. मी पंडित घरातील मुलगी मुस्लिमांमध्ये फसली होती. विरोध केल्यावर राजूने मारहाण केली. तो कुठे जात होता तेव्हा घराला कुलूप लावून जायचा. माझा मोबाइलही हिसकावला. तीन दिवसांनी एक नवा चेहरा समोर आला. बदर अख्तर सिद्दिकी हा छांगूरचा माणूस होता जो सौदीत राहून तिथल्या गोष्टी सांभाळायचा. माझ्यावर बळजबरी करण्यात आली, माझे व्हिडिओ बनवले आणि जर धर्म बदलला नाही तर व्हायरल करू अशी धमकी दिली. ३ महिने माझा छळ सुरू होता त्यानंतर माझा टूरिस्ट व्हिसा संपला तेव्हा वसीमने मला कर्नाटकला पाठवले असं तिने सांगितले.