रासायनिक कचऱ्याचा साठा सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:32 PM2019-08-26T23:32:12+5:302019-08-26T23:32:39+5:30

कोळगाव ग्रामस्थांनी पकडला साठा : रसायनांच्या प्रादुर्भावामुळे गावकऱ्यांना आजार

Chemical waste found in palghar | रासायनिक कचऱ्याचा साठा सापडला

रासायनिक कचऱ्याचा साठा सापडला

googlenewsNext

पालघर : कोळगावच्या जेनेसिस औद्योगिक वसाहतीमधील फेज नंबर ३ येथील एका गोडाऊनमधील सहा खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने जैविक टाकाऊ रासायनिक कचºयाचा साठा लपवून ठेवण्यात आला होता. सोमवारी ग्रामस्थांनी हा साठा पकडून तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.


जेनेसिस इंडस्ट्रीमध्ये गाळ्यात जैविक टाकाऊ रसायनांचा साठा अवैधरित्या साठवून ठेवला होता. त्या रसायनांच्या प्रादुर्भावामुळे गावकºयांना उलट्या होणे, चक्कर, मळमळणे अशा आजारांनी ग्रासले होते. या दुर्गंधीचा शोध घेण्याचा प्रयत्न ग्रामस्थ अनेक दिवसांपासून करत होते. परंतु शोध लागत नव्हता. सोमवारी ग्रामस्थांनी या अवैधरित्या साठवून ठेवलेल्या रसायनाचा शोध घेतला. दीड महिन्यांपासून या गोदामातून जैविक रसायनाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


ग्रामस्थांना या ठिकाणी रासायनिक द्रव्य भरलेले ३५० ड्रम, शेकडो गोण्या भरलेला कचरा आदी मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा आढळून आला. मालकाला ही बाब कळताच त्यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास येथे असलेला हा घातक कचरा ट्रकच्या सहाय्याने दुसरीकडे हलवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र त्याचवेळी कोळगाव गावाचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत हे रोखले. यावेळी ट्रक चालक आणि तेथे काम करणारे मजूर हे लागलीच पळून गेले. येथे उपस्थित कंपनीचा सुपरवायझर राकेश रॉय हा ग्रामस्थांच्या हाती लागला. राकेश रॉयला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर अजगर अली नामक व्यक्ती याचा सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सूत्रधाराला पकडल्यास आपल्या कारखान्यातील टाकाऊ जैविक कचरा देणाºया कारखानदारांचे बिंग फुटून या टोळीचा पर्दाफाश होऊ शकतो. तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेश नांदगावकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून रसायनांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रसायनांमुळे जिल्ह्यात प्रदूषणाची मात्रा वाढत जाऊन भूगर्भातील पाणीसाठे प्रदूषित झाले आहेत.

लोकांच्या जीवाशी खेळ
एमआयडीसी तारापूर आणि पालघरमधील काही कारखानदार आपल्या कंपनीतील टाकाऊ जैविक तसेच रासायनिक कचरा नवी मुंबईच्या वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पाठविण्यासाठीचा लाखो रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी कचºयाची विल्हेवाट लावणाºया टोळ्यांकडे तो सोपवतात. पैशासाठी लोकांच्या आणि पर्यावरणाच्या जीवाशी हे लोक खेळत आहेत. या टोळ्यांकडे हा कचरा सोपविल्यानंतर तो एखाद्या रस्त्याच्या निर्जन स्थळी अथवा नदी, नाले, शेतात फेकला जातो.

Web Title: Chemical waste found in palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.