अकोला : गांजाची वाहतूक करणाऱ्या एम. पी. ०४, जी.ए ८५०९ क्रमांकाच्या पिकअप वाहनाला सोमवारी दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेऊन १०.४४ लाख रुपये किमतीचा ४४ किलो गांजा जप्त केला. कारवाईत पोलिसांनी आरोपीस अटक केली. अमरावती येथून निघालेल्या एम. पी.०४ जी.ए. ८५०९ क्रमांकाच्या पिकअप वाहनातून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने खामगाव रोड लगत असलेल्या मानव शोरूम येथे नाकाबंदी करत चारचाकी वाहनाची तपासणी केली. यावेळी आरोपी इरफान खान जमीर खान (३०, रा. हमजा प्लॉट) याला ताब्यात घेतले, तर एक आरोपी पसार झाला. पोलिसांनी वाहनाची झाडाझडती घतली असता ४ लाख ४४ हजार रुपयांचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह पिकअप वाहन असा एकूण १० लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गांजा हा आमच्या प्लॉट येथे साठवून ठेवला जाणार असल्याची माहिती आरोपींनी दिली. आरोपीविरोधात जुने शहर पोलीस ठाणे येथे एनडीपीएस ॲक्ट मादक अमली गुंगीकारक द्रव्य कायदा कलम २० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.
गांजा तस्करी करणाऱ्यास अटक, १०.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 10:57 IST