लग्नाचा सनई-चौघडा वाजत होता, पाहुणे पंगतीचा आनंद घेत होते आणि नवरीचे वडील लग्नाच्या विधींमध्ये व्यस्त होते. याच धामधुमीत पाहुण्यांच्या वेषात आलेल्या दोन सूट-बूटवाल्या चोरट्यांनी ५० लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना ग्रेटर नोएडामध्ये घडली आहे. या हायप्रोफाईल चोरीमुळे लग्नाच्या आनंदावर विरजण पडले असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
ग्रेटर नोएडातील इकोटेक थर्ड कोतवाली परिसरातील चोगानपूर गावात असलेल्या 'गोल्डन ड्रीम फार्म हाऊस'मध्ये ही घटना घडली. येथे एका नामांकित डॉक्टरच्या मुलीच्या लग्नाचा सोहळा अत्यंत थाटामाटात सुरू होता. सर्व नातेवाईक आणि पाहुणे विधींमध्ये गुंग असताना, दोन तरुण अत्यंत व्यवस्थित पेहराव करून लग्नमंडपात शिरले. त्यांचा पेहराव बघून ते पाहुणेच असावेत, असा भास कोणालाही झाला असता. याच गोष्टीचा फायदा घेत, त्यांनी दागिन्यांनी भरलेल्या बॅगेवर नजर ठेवली आणि संधी मिळताच अवघ्या काही सेकंदात ५० लाखांचा मुद्देमाल घेऊन तेथून रफूचक्कर झाले.
पाठवणीच्या वेळी चोरीचा उलगडा
लग्नाचे सर्व विधी पार पडल्यानंतर जेव्हा मुलीच्या विदाईची वेळ आली, तेव्हा दागिने देण्यासाठी वडिलांनी बॅगेचा शोध घेतला. मात्र, ती बॅग जागेवर नव्हती. संपूर्ण फार्म हाऊस पालथे घातले, नातेवाईकांनी शोधाशोध केली पण बॅग कुठेच सापडली नाही. अखेर संशय आल्याने फार्म हाऊसचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी दोन संशयास्पद तरुण पाहुण्यांच्या गर्दीत मिसळून बॅग लंपास करताना स्पष्टपणे दिसून आले.
या घटनेनंतर लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. इकोटेक थर्ड पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची ही घटना रात्री उशिरा घडली आहे. अद्याप पीडित कुटुंबाकडून अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही, मात्र फार्म हाऊस व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. "आम्ही सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत आहोत. चोरट्यांच्या हालचालींवरून त्यांनी आधीच रेकी केली असावी असा संशय आहे. लवकरच आरोपींना बेड्या ठोकल्या जातील," असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Web Summary : Dressed in suits, thieves stole ₹50 lakhs worth of jewelry from a Greater Noida wedding. CCTV footage captured the high-profile theft during the ceremony. Police investigation is ongoing.
Web Summary : ग्रेटर नोएडा में शादी समारोह में सूट-बूट पहने चोरों ने 50 लाख रुपये के गहने चुरा लिए। सीसीटीवी में कैद हुई चोरी, पुलिस जांच जारी है।