लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वांद्रे येथील बळीराम हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संस्थेच्या प्राचार्यांविरोधात खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजने बनावट निकालपत्र दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कॉलेजचे प्राचार्य सुनील मगदुम यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
हिरे कॉलेजने मणिपूरमधील संगाई इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची संलग्नता घेतली होती. मात्र, अनियमिततांमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने या विद्यापीठाची मान्यता रद्द केली होती. मात्र, याबाबत कॉलेजने विद्यार्थ्यांना माहिती दिली नाही. तसेच नियमबाह्य पद्धतीने परीक्षा घेतल्या. मात्र, या परीक्षेचे निकाल दोन वर्षे झाले तरी विद्यार्थ्यांना देण्यात आले नाही. याबाबत वारंवार कॉलेजकडे विचारणा केल्यावर कॉलेजने सिक्कीम इंटरनॅशनल विद्यापीठामार्फत पदवी दिली जाईल, असे सांगितल्याचा आरोप विद्यार्थिनी निधी राऊत हिने तक्रारीत केला आहे.
दरम्यान, या विद्यापीठाबाबत तपासणी केली असता त्यामध्ये केवळ बी. व्होक आणि डि. व्होक हेच इंटिरियर डिझायनरचे अभ्यासक्रम आढळून आले. मात्र, असे असतानाही कॉलेजने विद्यार्थ्यांना बीएससीचे निकालपत्र दिले आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे. तसेच निकालावरील बोधचिन्ह हे सिक्कीम विद्यापीठाचे नव्हते. काही विद्यार्थ्यांना दिलेल्या निकालात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेले विषय आणि निकालपत्रातील विषय भिन्न असल्याचे आढळून आले आहे. तसेच विद्यार्थ्याने परीक्षा जानेवारी २०२४ मध्ये दिलेली असताना निकालावर मात्र डिसेंबर २०२३ रोजी निकाल केल्याचा दिनांक नमूद केले आहे.
‘दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करा’
- काही महाविद्यालयांचे विश्वस्त आणि प्राचार्य उच्च शिक्षणाचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहेत.
- विद्यार्थ्यांना बनावट अथवा अवैध प्रमाणपत्रे देत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. हिरे कॉलेजने बनावट मार्कशिट दिल्याचा प्रकार आम्ही समोर आणला आहे.
- या गंभीर प्रकरणाकडे राज्य शासन व संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत ही बाब चिंताजनक आहे.
- संबंधित दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस गांगुर्डे संतोष यांनी केली आहे.
Web Summary : Principal of Baliram Hire College booked for providing fake mark sheets. Students allege college misled them about university affiliation and exam irregularities, issuing invalid BSc certificates. MNS demands strict action.
Web Summary : फर्जी मार्कशीट देने पर बळीराम हिरे कॉलेज के प्रिंसिपल पर मामला दर्ज। छात्रों का आरोप है कि कॉलेज ने विश्वविद्यालय की संबद्धता और परीक्षा अनियमितताओं के बारे में गुमराह किया, अवैध बीएससी प्रमाण पत्र जारी किए। मनसे ने सख्त कार्रवाई की मांग की।