वास्को : सडा येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार आल्यानंतर मुरगाव पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरू करून २४ तासांत त्याचा शोध लावला. त्या मुलाचे अपहरण झाले नसून तो स्वतःच प्रयागराज, उत्तरप्रदेश येथे फिरायला गेल्याचे पोलिसांना अजूनपर्यंतच्या तपासात समजले आहे. प्रयागराज येथे पोहोचलेला मुलगा सुखरुप असून लवकरच त्याला गोव्यात आणण्याची व्यवस्था केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
तीन दिवसांपूर्वी सडा येथे राहणारा अल्पवयीन मुलगा शिकवणीसाठी (ट्युशन) जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. आठवीत शिकणारा मुलगा तेव्हा घरातून गेल्यानंतर पुन्हा घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र त्यांना तो सापडला नाही. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मुलाच्या वडिलांनी मुरगाव पोलिस स्थानक गाठून त्यांचा १४ वर्षीय मुलगा गायब असल्याची माहिती दिली. वडिलांनी मुलगा गायब असल्याची माहिती देताच पोलिसांनी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवून शोधकार्य सुरू केले.
त्यावरून पोलिसांना तो मुलगा स्वतःहून कुठेतरी निघून गेल्याचा संशय निर्माण झाला. त्या मुलाने घरात कोणाला काहीच न सांगता तो का निघून गेला, त्याबाबत पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, प्रयागराज येथे त्या मुलाचे नातेवाईक असून तो त्यांच्या घरी पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.
पुन्हा भेटू सांगितले आणि क्लिक झाले...
अल्पवयीन मुलगा गायब झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्या काही मित्रांची विचारपूस केली. त्याच्या काही मित्रांनी त्या मुलाने आम्हाला गायब होण्यापूर्वी भेटल्याचे सांगितले. तसेच पुन्हा काही दिवसानंतर भेटू, असेही सांगितल्याची माहिती दिली. वार्का येथील १३ आणि १४ वर्षाच्या शाळकरी मुले पालकांशी झालेल्या वादानंतर ५ रोजी घराबाहेर पडली होती. पोलिसांनी भुसावळला येथे मुलांना सुखरूप ताब्यात घेतले होते.