औरंगाबाद : गावाकडील नापिकीमुळे हाताला काम नव्हते. शहरात जाऊन काम करू. कमीत कमी रोजी-रोटीचा प्रश्न तरी मिटेल, या आशेने आव्हाना (ता. भोकरदन) येथून औरंगाबादेत आलेल्या एका तरुणाने अखेर बेरोजगारीला कंटाळून घरातच गळफास घेतला. बुधवारी मुकुंदवाडी भागात ही घटना घडली. समाधान रामचंद्र ठाले (३२), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मृत समाधानचे चुलते रूपचंद कडुबा ठाले यांनी सांगितले की, भोकरदन तालुक्यात मागील चार वर्षांपासून दुष्काळामुळे नापिकी आहे. गावात काहीच काम नव्हते. समाधान हा दहावी शिकलेला असून, तो चालक म्हणून खाजगी वाहनांवर काम करीत होता. पत्नी, एक मुलगी व मुलगा, असे चार जण तीन वर्षांपूर्वी कामाच्या शोधात औरंगाबादेत आले होते; परंतु येथेही त्याला समाधानकारक काम न मिळाल्यामुळे तो सतत तणावात राहत असे. यातून त्याने १५ डिसेंबर रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेतला. त्याला तात्काळ घाटीत नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या
By admin | Updated: December 16, 2015 00:16 IST