बैसला तो चित्ती निवडेना
‘पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग... तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना’ अशीच आमची अवस्था झाली आहे. कोरोनाकाळातील दोन वर्षाचा अपवाद वगळता मागील ७ वर्षापासून दिंडीत जात असते माझे सासू. सासरे मागील अनेक वर्षापासून वारीत जातात. त्यांच्या प्रेरणेतून मी दिंडीत सहभागी झाले आणि पांडुरंगाची ओढ काय असते हे कळले. वारीत आपण आज कुठे मुक्काम करत असतो, कुठे कीर्तन, कुठे प्रवचन असे याच आठवणी मनात रुंजी घालत आहेत. आम्ही देहाने जरी शहरात असलो तरी मनाने वारीतच आहोत.
कुंदा पठारे
वारकरी
----
संसारात आनंद, वारीत परमानंद
संसारात आनंदाची प्राप्ती होते पण पंढरपूरच्या वारीत सहभागी झाल्यावर परमानंद प्राप्त होतो. याची अनुभूती मागील २५ वर्षांपासून घेत आहे. पूर्वी आळंदी येथे माऊलीच्या दिंडीसोबत वारी करत असे, पण नंतर गंगापूर येथील रामभाऊ राऊत महाराज यांच्या दिंडीसोबत पंढरीला जाणे सुरू केले. मागील दोन वर्षांपासून वारीत खंड पडला आहे. मात्र, आम्ही येथे घरात बसून मानने वारीची अनुभूती घेत आहोत. वारीवरील निर्बंधांमुळे यंदाही आम्ही घरीच आषाढी एकादशी साजरी करणार आहोत. भक्ताला सर्वत्र भगवंतांचे दर्शन होत असते. मग घरी असो वा वारीत.
शारदा बोचरे
वारकरी