बीड : रबी-खरीप हंगामामध्ये भरड धान्य विकास कार्यक्रमांतर्गत बियाणांचे वाटप केले जाते. गतवर्षी बीड तालुक्यात मका बियाणांचा दर्जा निकृष्ट असल्याने उगवण झाली नव्हती. यंदा खरिपातील बाजरीच्या कणसाचे दाणेच भरले नसल्याने शेतकऱ्यांवर उपोषणाची वेळ आली आहे.अतिवृष्टीच्या माऱ्यानंतरही आष्टी तालुक्यात काही प्रमाणात बाजरीचे पीक बचावले होते. शेतकऱ्यांना उत्पादनाबाबत आशा असतानाच कणसातच दाणे न भरल्यामुळे भ्रमनिरास झाला होता. यामध्ये ७० टक्के नुकसान झाले असून, नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आष्टी तालुक्यातील पिंप्रीघुमरी येथील घनश्याम हरीभाऊ पांडूळे, शिवाजी गुलाबराव पांडूळे हे गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. शासन दरबारीही दखल घेतली जात नसल्याने एक ना अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते.अर्थार्जनच्या उद्देशाने कृषी विभागाच्या माध्यमातून खासगी कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. याविषयी घनश्याम पांडुळे यांनी कृषी अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता, केवळ भेटीचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात कोणताही निर्णय न झाल्याने या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह आहे. (प्रतिनिधी)
यंदाही बियाणांमधून शेतकऱ्यांची फसवणूक
By admin | Updated: December 24, 2016 21:54 IST