औरंगाबाद : साई कला केंद्राच्या नावाखाली कुंभेफळ येथे खुलेआम सुरू असलेल्या कुंटणखान्यावर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी केंद्राचा चालक, ग्राहक, मुली आणि आंटी, अशा अनेकांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, शेंद्रा औद्योगिक वसाहतीजवळ गेल्या काही वर्षांपासून साई कला केंद्र सुरू आहे. या कला केंद्राविषयी पोलिसांकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत. तेथे ग्राहकांना वेश्या पुरविण्यात येतात. या तक्रारीची दखल घेत अमितेश कुमार यांनी ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षकांना तातडीने कारवाई करण्याचे कळविले. त्यानंतर सूत्रे हलविण्यात आली. रात्री ९ वाजेच्या सुमारास दरोडा प्रतिबंधक पथकासह, करमाड आणि चिकलठाणा पोलिसांचे संयुक्त पथक बनविण्यात आले. तेथे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन बनावट ग्राहक पाठविण्यात आले. त्यांच्याकडे प्रत्येकी अडीच हजार रुपये देण्यात आले. या नोटांचे नंबर पोलिसांनी आधीच लिहून ठेवले होते. पोलिसांचे बनावट ग्राहक बराच वेळ कला केंद्र्रात बसल्यानंतर त्यांना तेथील स्पेशल पार्टीसाठी आत बोलाविण्यात आले. नाचगाण्याच्या नावाखाली तेथे उपस्थित असलेल्या मुली वेश्या म्हणून त्यांच्यासमोर उभ्या करण्यात आल्या. यावेळी आंटी माया आंधारे हिने त्यांच्याशी सौदेबाजी केली. कला केंद्राच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची माहिती खरी असल्याविषयीचा इशारा बनावट ग्राहकांनी पोलिसांना केला. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा मारला. या छाप्यात आंटी माया अांधारे, केंद्रचालक बाबासाहेब किसन गोजे यांच्यासह जालना, श्रीरामपूर, बीड आणि परळी येथील रहिवासी असलेल्या १९ ते २० वयोगटातील चार तरुणी, तीन ग्राहक आणि एक विधिसंघर्षग्रस्त मुलगा यांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्या विरोधात करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
कला केंद्रात सुरू होता कुंटणखाना
By admin | Updated: October 7, 2014 00:44 IST