औरंगाबाद : अंगणवाडी कार्यकर्त्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला होता. पोलिसांनी आयुक्तालयासमोरील रस्त्याजवळच मोर्चा अडविल्यामुळे पोलीस आणि आंदोलनकर्त्या महिलांमध्ये हमरीतुमरी झाली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मागण्यांच्या घोषणा सोडून पोलिसांविरुद्धच घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचा हा मोर्चा पैठणगेटहून निघून दुपारी २ च्या सुमारास विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ पोहोचला. मोर्चात शेकडो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. मागण्यांच्या अनुषंगाने जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाण्यापूर्वी रस्त्यावर मोर्चा अडविण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी मोर्चेकरी महिलांना पुढे कार्यालयाजवळ येऊ देण्यास मनाई केली. तरीही महिलांनी गेटपर्यंत येण्याचा प्रयत्न केल्यावर उदार यांच्या आदेशावरून पुरुष पोलिसांनी आंदोलक महिलांना मागे लोटण्याचा प्रयत्न केला. पुरुष पोलिसांनी अंगाला हात लावल्यामुळे महिला संतापल्या. त्यांनी प्रलंबित मागण्यांबाबतच्या घोषणा बाजूला ठेवून पोलिसांविरुद्धच घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर शेषराव उदार यांनी दम देऊन आम्हाला भीती दाखविण्याचा प्रयत्न केला, असे आंदोलकांचे म्हणणे होते. उदार यांनी ‘वज्र’ हे दंगा नियंत्रण वाहन मागविले. त्यामुळे आंदोलकांचा संताप अनावर झाला होता. नंतर पोलीस निरीक्षक नानासाहेब कोंडे यांनी मध्यस्थी करून आंदोलकांच्या नेत्यांना समजावून सांगितल्यावर तणाव निवळला. आंदोलकांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रा. राम बाहेती, अभय टाकसाळ, आशा सोनवणे, माया भिवसने, मुरली म्हस्के, बद्रीप्रसाद दीक्षित, ललिता दीक्षित, शालिनी पगारे, आलमशूर शेख, सुनीता वायकोस, सुनीता शेजवळ, नूरजहा पठाण, अनिता शर्मा, सुधा जोशी, सीमा व्यवहारे आदी सहभागी झाले होते.
कार्यकर्त्या-पोलिसांमध्ये हमरीतुमरी
By admin | Updated: July 23, 2014 00:40 IST