कळंब : शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच कळंब तालुक्यातील हसेगाव (केज) येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवजयंतीनिमित्त गावात झेंडा लावत असताना झाडावरुन कोसळल्याने या युवकाचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. सदर घटनेत युवकांना विद्युत प्रवाहाचा धक्का लागला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.कळंब तालुक्यात यावर्षी शिवजयंतीची अभूतपूर्व तयारी चालू आहे. संपूर्ण शहरात झेंडे, बॅनर लावण्यात आल्याने वातावरण शिवमय झाले आहे. याचे लोण ग्रामीण भागातही पोहचले आहे. गावोगावी झेंडे बसविण्यासाठी युवक कार्यमग्न झालेले आहेत. तालुक्यातील हसेगाव (केज) येथेही रस्त्यावर, प्रमुख चौकात झेंडे बसविणे सुरु होते. हसेगावमधून ईटकूरला जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला श्रीकांत दादाराव तोडकर (वय १९) व अतुल रत्नलिंग धुमाळ (वय १९) हे आपल्या मित्रासमवेत रविवारी ६ वाजण्याच्या सुमारास झेंडे लावत होते. यासाठी लोखंडी बायडिंग तारेला झेंड्याची पताका करुन एका बाभळीच्या झाडावर बांधण्यासाठी ते चढले. यावेळी दोघेही अचानक खाली कोसळले. जखमी युवकांना तात्काळ कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारार्थ हलविण्यात आले. परंतु रस्त्यातच दोघांपैकी श्रीकांत दादाराव तोडकर याचा मृत्यू झाला त्याचा मित्र अतुल धुमाळ याच्यावर अंबाजोगाई येथे उपचार चालू आहेत. (वार्ताहर)झेंड्याची माळ बायडिंग वायरला गुंपण्यात आली होती. ज्या बाभळीच्या झाडावर हसेगाव येथील युवक ही माळ गुंतविण्यासाठी चढले होते त्या झाडामधून विजेच्या दोन तारा गेल्या होत्या. सदर तारा दिसून येत नव्हत्या. या तारामधील प्रवाह बायडिंग वायर हातात असलेल्या युवकांना लागला असल्याची शक्यता आहे. कारण युवक खाली कोसळले त्यावेळेस लाईट ट्रीप झाली होती. यामुळे मयत व जखमी युवकास विजेचा धक्का लागला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ४ मयत श्रीकांत हा कळंब येथे १२ वी मध्ये शिक्षण घेत होता. त्याचे वडील कळंब येथील एका कापड दुकानात कामास आहेत तर मोठा भाऊ किरकोळ भांडी विक्रीचा व्यवसाय करतो. एक बहिण अविवाहित आहे. अतिशय मनमिळावू व सामाजिक कार्याची आवड असलेल्या या उमद्या तरुणाचा अनेकांच्या जिवलग मित्राच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात होती.
झेंडा लावताना कार्यकर्त्याचा मृत्यू
By admin | Updated: February 17, 2015 00:38 IST