वाळूज महानगर : वाळूज- कमळापूर रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदार तीन महिन्यांपासून गायब झाल्यामुळे डांबरीकरणाचे काम बंद पडले आहे. काम अर्धवट सोडल्यामुळे या रस्त्यासाठी मंजूर झालेले ८७ लाख रुपयांचे काय होणार, असा प्रश्न आहे.दुरवस्था झालेल्या वाळूज- कमळापूर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ८७ लाख रुपये मंजूर केले होते. गेल्या मार्च महिन्यात या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गंगापूर येथील वाकडे व रमेश शिंदे या ठेकेदारांना देण्यात आले होते. त्यांनी रस्त्यावर खड्डे बुजवून तसेच खडी अंथरूण रस्त्याची दबाई केली आहे. खड्डे व खडी अंथरूण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे दाखवत ठेकेदार डांबरीकरण न करताच अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता पूर्वपदावर येत आहे. खडीची दबाई व्यवस्थित न झाल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे लहान- मोठे अपघात होत आहेत. ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य शिवप्रसाद अग्रवाल, माजी सदस्य चंद्रकांत पवार, रवींद्र सिरसाठ, जोगेश्वरीचे उपसरपंच नजीरखाँ पठाण यांनी केला आहे.कारपेट व सीलकोटसाठी सूचनायाविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता जी.बी. पोहेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या रस्त्याच्या कामासाठी जवळपास ४० लाख रुपयांचे बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. या रस्त्यावर कारपेट व सीलकोट टाकण्याच्या सूचना या ठेकेदारांना केल्या आहेत. अधिकारी ठेकेदारांची हातमिळवणीवाळूज औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी वाळूज व शेंदुरवादा परिसरातील कामगार व नागरिकांसाठी हा जवळचा रस्ता आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याचे काम सुरू झाले; पण ते अर्धवट सोडून ठेकेदार पसार झाल्यामुळे रस्त्याची पुन्हा दुरवस्था होत आहे. संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आले असून त्वरित पुन्हा काम करावे.-शिवप्रसाद अग्रवाल, ग्रा.पं. सदस्य, वाळूजरस्त्याची ‘जैसे थे’ अवस्थाचार महिन्यांपूर्वीच रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, गुणवत्तापूर्ण काम न करता निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडत चालले आहेत. या रस्त्याची ‘जैसे थे’ अवस्था झाली असून ठेकेदार व अधिकारी नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. या रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आंदोलन करील.- दीपक बडे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस गंगापूर तालुका
रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदार गायब
By admin | Updated: July 22, 2014 00:36 IST