इन्फ्रा योजनेची कामे रखडलीजालना : मागेल त्याला जोडणी व योग्य दाबाने वीज मिळावी म्हणून महावितरणकडून इन्फ्रा दोन ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, विभाग एक अंतर्गत बऱ्यापैकी कामे झाली असली तरी विभाग दोन अंतर्गत महावितरण व कंत्राटदार यांच्या वादात ही योजना रखडली आहे. संबंधित कंत्राटदार न्यायालयात गेल्याने ही कामे जैसे थेच आहेत. जिल्ह्यात महावितरणचे ग्राहक वाढत आहेत. दाब वाढत आहे. यामुळे घरगुती, शेतकरी व व्यावसायिकांना वीज मिळण्यास अनेक अडचणी येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन महावितरणने तब्बल १५८ कोटी १० लाख रूपये खर्चांची इन्फ्रा दोन ही योजना राबविण्याचे ठरविले. त्यानुसार महावितरणच्या विभाग एक मध्ये ८७ कोटी ८० लाखांची तर दोन अंतर्गत ७० कोटी ३० लाख रूपयांची पायाभूत कामे करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार विभाग दोनमध्ये मंठा, परतूर, अंबड व घनसावंगी तालुक्यात ७०.८० कोटींची कामे सुरू असून, ही कामे अंतिम टप्प्यात असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या अंतर्गत ३३ केव्ही क्षमतेचे चार नवीन उपकेंद्र, ३३२ मीटरची उच्च दाब व ६४७ मीटरची लघु दाब वाहिनी अंथरण्यात आली. ८७८ नवीन रोहित्रांची उभारणी तर ६४७ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. विभाग दोनची बहुतांश कामे काही दिवसांत पूर्ण होतील, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र विभाग एक अंतर्गत जालना ग्रामीण, जाफराबाद, भोकरदन व बदनापूर तालुक्यात ८३.८० कोटी रूपयांची पायाभूत कामे करावयाची आहेत. यात चार नवीन ३३ केव्हीचे उपकेंद्र, ४८२ मीटरची उच्च दाब वाहिनी तर ८१५ मीटरची लघुदाब वाहिनी अंथरण्यात येत आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने यातील बहुतांश कामे सुरूच केलेली नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. यामुळे या विभागातील अनेक गावांत वीजजोडणी मिळण्यास अडचण आहे. शेतकऱ्यांना नवीन जोडणी देण्यासोबतच रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. करण्यात येणाऱ्या कामांना ब्रेक लागला आहे. (प्रतिनिधी)
इन्फ्रा योजनेची कामे रखडली
By admin | Updated: October 14, 2016 00:14 IST