औरंगाबाद : हुसेननगर भागात घरामध्ये जळालेल्या महिलेचे शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी ४.३० वाजता करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवल्यामुळे तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. तिच्या नावाबाबतही संभ्रम निर्माण झाला असून, शनिवारी मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितलेले रत्ना श्याम पगारे हे नाव चुकीचे असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. तिचे खरे नाव रत्ना अनिल पवार असल्याचे समोर आले आहे. रविवारी रेकॉर्डवर पोलिसांनी दुरुस्ती केली. पोलिसांनी सांगितले की, तिचा पती अनिल हा सहा वर्षांपासून वेगळा राहतो. त्यांना तीन अपत्ये असून मुलीचे लग्न झालेले आहे. एक मुलगा अनिलकडे तर दुसरा मुलगा रत्नाकडे असतो. रविवारी मृत रत्नाचे वडील काशीनाथ राऊत, तिचा पती अनिल, मुलगा व बहीण असे नातेवाईक घाटीत आले होते. पोलिसांनी तिच्या वडिलांचा जबाब घेतला असून त्यांनी कुठलीही तक्रार नसल्याचे सांगितले. दरम्यान शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. एन-६ मधील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जळालेल्या महिलेचा ‘व्हिसेरा’ ठेवला राखून
By admin | Updated: November 16, 2015 00:40 IST